

पणजी : गोव्यासह दिल्ली व कर्नाटकमध्ये दरोडे टाकून भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या पाच बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीला क्राईम ब्रँचच्या पथकाने दिल्लीहून रेल्वेने गुरुवारी (३० एप्रिल) गोव्यात आणले. या टोळीने दोनापावला व म्हापसा येथे दरोडे घालून दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
गोव्यात आणण्यात आलेल्या दरोडेखोरांमध्ये सुमन हलदार, सैफुल इस्लाम, सोहेल शेख, मोहम्मद नासीर, तूर इस्लाम याचा समावेश आहे. त्यांनी दरोडे घालण्यासाठी वापरलेली काही हत्यारे तसेच इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीतील दरोडा प्रकरणातील तपासानंतर या टोळीला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या सोमवारी (२७ एप्रिल) क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली २४ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक दिल्लीला गेले होते.
हे पथक राजधानी एक्स्प्रेसने मडगाव येथे दरोडेखोरांना घेऊन दाखल झाले. दरोडेखोरांना मडगाव येथून थेट रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात नेण्यात आले. या सर्वांना शुक्रवारी (१ मे) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याना क्राईम ब्रँचच्या कोठडीत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली.
दिल्लीत झाला होती चकमक...
दरोडेखोर दिल्लीत दरोडा घालण्यास येणार असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिल्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईवेळी दरोडेखोर व दिल्ली पोलिसांमध्ये गोळीबार होऊन चकमक झाली होती. या चकमकीवेळी दिल्ली पोलिसांनी रोखठोक उत्तर देत सहा दरोडेखोरांचा पाठलाग करून अटक करण्यात यश मिळवले होते. मात्र, यातील दोघे पसार झाले होते.