HSRP Number Plate Pudhari
नाशिक

Nashik RTO HSRP Number Plate | विना'एचएसआरपी' नंबर प्लेट वाहनांना दंड

Nashik RTO HSRP Number Plate | जिल्ह्यामध्ये १.८८ लाख वाहनांचे अद्ययावतीकरण बाकी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, ३० जूनची अंतिम मुदत संपल्यानंतर आता नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९ हजार ५४६ वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणीनी केली असून, त्यापैकी ३ लाख ९६ हजार ७७५ वाहनांवर एचएसआरपी बसविण्यात आल्या आहेत. मात्र, १ लाख ८८ हजार ५७२ वाहनधारकांनी अद्याप नंबरप्लेट बसविलेली नाही. आरटीओ प्रशासनाने वाहनधारकांना तातडीने एचएसआरपी बसविण्याचे आवाहन केले आहे.

नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच एचएसआरपी नसलेल्या वाहनांचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, विमा अद्ययावत करणे, दुय्यम नोंदणी अशा विविध सेवादेखील अडचणीत येऊ शकतात.

नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एचएसआरपीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एम एस एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, वाहनधारकांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या जवळच्या केंद्रावर निश्चित तारखेला नंबर प्लेट बसवून दिली जाते. जिल्ह्यात यासाठी ६५ केंद्रे कार्यरत आहेत.

एचएसआरपीची वैशिष्ट्ये

एकदा बसविल्यानंतर पुन्हा वापरता येत नाही. बनावट नंबर प्लेट तयार करणे कठीण. अशोक चक्र होलोग्राम, लेसर कोड व रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म. वाहनांची ओळख व तपास सुलभ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT