नाशिकरोड : नाशिकरोडसह परिसरात वावर असलेल्या बिबट्याला तीन महिन्यांच्या प्रर्यत्नानंतर जेरबंद करण्यात वन विभाग व पोलिसांना यश आले आहे. जयभवानी रोड येथील चव्हाण मळ्यात लावलेल्या पिंजऱ्या हा बिबट्या शुक्रवारी (दि.10) पहाटे जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचरा निश्वास सोडला आहे.
सकाळी आठच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्याने नागरिक कुरेशी सय्यद व मुन्ना सय्यद यांनी याबाबत शिवसेनेचे विक्रम कदम यांना माहिती कळविली. कदम यांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री केल्यानंतर वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने धाव घेत नागरिकांच्या मदतीने बिबट्याला म्हसरूळच्या पुनवर्स केंद्रात हलविले. जयभवानी रोडवर दाट लोकवस्ती आहे. शेजारीच लष्कराचा दाट झाडीचा परिसर आहे. त्यामुळे त्या भागातून दिवसाढवळ्या बिबटे नागरी भागात येतात. येथून जवळच असलेल्या वडनेर भागात बिबट्याने दोन महिन्यांत दोन बालकांचे बळी घेतले आहेत. तसेच अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केले आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी दोनवेळा वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
विशेष म्हणजे जयभवानी रोड भागात बिबट्यांना पकडण्यासाठी तीन महिन्यांपासून पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, नागरी वस्तीत पिंजरे लावल्याने त्यातील कोंबड्या काही लोक चोरून नेत असतं. त्यामुळे पिंजऱ्यांच्या जागा बदलण्याची मागणी शिवसेनेचे विक्रम कदम, गणेश कदम, सागर जाचक, राजेंद्र थोरात, सलीम सय्यद यांनी केली. त्यामुळे वनविभागाच्या साथीने तीन आठवड्यापूर्वी पिंजऱ्यांची जागा बदलण्यात आली. आज पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी- कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
परिसरात अनेक बिबट्यांचा वावर
नाशिक रोड, एकलहरा, देवळाली कॅम्प, देवळालीगाव परिसर, वडनेरगेट, जयभवानी रोड येथील मनोहर गार्डन, औटे मळा, डोबी मळा, जाचक मळा, पाटोळे मळा, लोणकर मळा, थोरात मळा, चव्हाण मळा भागात अनेक बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे जिल्हा व सदर परिसर वनविभागाने बिबटे प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावा. बिबट्यांच्या प्रजनन नियंत्रणावर उपाययोजन कराव्यात. बिबट्यांचे स्थलांतर करावे. बिबटे पकडल्यानंतर त्याच्या शेपटीत चीप बसवावी. लष्कराच्या कुंपणावर लेजर आधारीत सायरन लावावे अशी मागणी विक्रम कदम, मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित, रियाझ सय्यद आदींनी केली आहे.
बिबट्यासोबत नागरिकांची ‘सेल्फी’
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कळताच परिसरातील उत्साही नागरिकांनी धाव घेत बिबट्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, परिसरात अजुनही बिबटे असल्याने जयभवानी रोड येथील मळे विभागात पुन्हा पिंजरे लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे.