

सिडको (नाशिक) : जुने सिडको लगत खोडे मळा व कामटवाडे परिसरात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे खोटे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एआय च्या सहाय्याने बिबट्याचे फोटो तयार करून व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, यासाठी सायबर क्राईम ब्रॅच ला पत्र देणार असल्याची माहिती नाशिक पश्चिमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मल यांनी दिली .
कामटवाडे भागात स्वीट दुकानाजवळ आणि जुने सिडकोलगत खोडेमळा येथील मिसळ दुकानाजवळ बिबट्याचे वावर दाखवणारे फोटो व्हायरल होताच, नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण झाले. नाशिक पश्चिम वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल फोटोची तपासणी करण्यात आली असता हे फोटो एआयच्या सहाय्याने बनवलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामटवाडे परिसरातील सर्व प्रमुख चौकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही बिबट्याच्या हालचालीचा कोणताही ठसा आढळला नाही.अशा प्रकारच्या बनावट पोस्ट नागरिकांमध्ये घबराट निर्माण करतात आणि प्रत्यक्षात बिबट्याचा वावर असलेल्या भागांविषयी लोकांचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे वनविभागाने या घटनेकडे गंभीर दृष्टीने पाहिले असून संबंधित व्यक्तींविरुद्ध सायबर क्राईम ब्रॅंचकडे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा फोटो प्रसारित करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
कामटवाडे भागातील नागरिकांनी सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता तीन ते चार दिवसा पर्यंत बिबट्याच्या हालचालीचा कोणताही ठसा आढळला नाही. अश्या खोट्या पोस्ट व्हायरल करणा-यांवर कारवाई केली पाहिजे .
ॲड . तानाजी जायभावे, माजी नगरसेवक
सिडको भागात खोटे बिबट्याचे फोटो व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेऊन गुन्हा दाखल केला पाहिजे .
किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
एआय च्या सहाय्याने बिबट्याचे खोटे फोटो लोकेशन टाकुन व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे यासाठी सायबर क्राईम बॅचला पत्र देणार आहे . काही खोटे फोटो मध्ये तर बिबटया फोटो साठी पोज देत असल्याचे दाखविले आहे . नागरिकांनी खात्री करावी .
सुमित निर्मल, वन अधिकारी, नाशिक