Nashik Ring Road 
नाशिक

Nashik Ring Road Farmer Protest | रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढणार

Nashik Ring Road Farmer Protest | मंत्री गिरीश महाजन : शेतकरी शिष्टमंडळाने घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिंगरोड प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मध्यम मार्ग काढून त्यांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने मंत्री महाजन यांची भेट घेतली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यावर सकारात्मक तोडगा असल्याचे सांगितले.

काढणार बैठकीत मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले की, ज्या गावांचा अलाइनमेंट बाबत प्रश्न आहे, त्या प्रत्येक गावातील प्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसवून प्रत्यक्ष चर्चा करून तोडगा काढला जाईल.

कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची शासन पूर्ण काळजी घेईल. तसेच प्रत्येक गावनिहाय परिसरातील उच्चतम खरेदी विक्री दराचा आधार घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रिंगरोड संदर्भातील अलाइनमेंट व मोबदल्याबाबत झालेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत गवळवाडीमार्गे रिंगरोड नेण्याच्या पर्यायावरही सकारात्मक चर्चा झाली. या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पडताळणी करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी होईल, अशा पद्धतीने निर्णय घेण्याबाबत मंत्री महाजन यांनी भूमिका मांडली. बैठकीनंतर करण गायकर यांनी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या भूमिकेवर आम्ही ठाम असून, अंतिम निर्णय होईपर्यंत संयमाने आणि एकजुटीने लढा सुरू राहील, असे स्पष्ट केले.

मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

याच आठवड्यात मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, एमएसआयडीसी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत सर्व प्रलंबित मुद्यांवर अंतिम चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. याही बैठकीत अंतिम तोडगा न निघाल्यास त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT