Land Acquisition, Nashik file photo
नाशिक

Nashik Land Acquisition | नाशिकमध्ये भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक! जमीन ताब्याच्या प्रक्रियेला 10 दिवसांची स्थगिती

Nashik Land Acquisition | मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिंगरोड, महामार्ग क्रमांक २९ आणि चिंचोली महामार्गाच्या भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. २८) झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अखेर जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला आठ ते दहा दिवसांची स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मंगळवारी मुंबईत पालकमंत्र्यांसोबत बैठक, तर बुधवारी गवळवाडी पर्यायी मार्गाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विधान परिषदेचे आमदार गोकुळ गिते यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सुमारे २०० शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन अन्य कार्यक्रमामुळे जळगाव दौऱ्यावर असल्याने त्यांनी आमदार गिते यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते.

सुमारे तीन ते चार तास चाललेल्या बैठकीत चुकीची रस्तेआखणी, अपुरा मोबदला, बागायती जमिनींचे मूल्यांकन, सर्व्हिस रोड आणि पोलिस बंदोबस्तात जमिनींचा ताबा घेण्याच्या नोटिसा या मुद्द्यांवर चर्चा झाली.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी पालकमंत्री महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांची भूमिका मांडली. त्यानंतर आमदार गिते यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, अन्यथा शेतकरी कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनापर्यंत प्रश्न न सुटल्यास अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस अक्षय काकड, दीपक आगवणे, सुदर्शन पाटील, संजय सहाणे, संजय चुंबळे, भास्कर चुंबळे, विश्वास नागरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी कधी?

मुख्यमंत्र्यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या लेखी आदेशानुसार गवळवाडी पर्यायी मार्गाचे आठ दिवसांत फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. पंधरा गावांचे निवाडे प्रलंबित असताना अवघ्या १५ दिवसांत १२ ते १४ गावांचे निवाडे घाईघाईने जाहीर करण्यात आल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. चुका दुरुस्त करण्याऐवजी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT