Nashik Ring Road 
नाशिक

Nashik Ring Road Project | रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी घेतली मंत्री महाजनांची भेट

Nashik Ring Road Project | अलाइनमेंट, मोबदला, शेतकऱ्यांच्या तक्रारीवर केली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत गुरुवारी (दि.११) कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने भेट घेतली. यावेळी रिंगरोड प्रकल्पामुळे प्रभावित होत असलेल्या शेतकरी बांधवांच्या समस्या, प्रशासनाकडून झालेल्या त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या भेटीत शेतकरी प्रतिनिधींनी नाशिक जिल्हा प्रशासन व एमएसआरडीसी प्रशासनाकडून रिंगरोडच्या अलाइनमेंट संदर्भात झालेल्या त्रुटी, चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आलेले मोबदल्याचे दर, तसेच शेतकरी व मंत्रीस्तरावर दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत निवेदन सादर केले.

यावर सकारात्मक भूमिका घेत मंत्री महाजन यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व आदेश देण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वतःच्या उपस्थितीत एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि रिंगरोडबाधित शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त मॅरेथॉन बैठक घेऊन सर्वांना न्याय मिळेल, अशी ग्वाही दिली.

मंत्री महाजन म्हणाले, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. कोणालाही विनाकारण बेघर केले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा घरे बाधित होत असतील, ते वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शासनाने आतापर्यंत तयार केलेल्या चार अलाइनमेंटपैकी गवळवाडीसह कमीत कमी घरे, विहिरी व शेतीबाधित होईल असा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी पुढील बैठकीत सर्व संबंधित पक्षांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय ज्या गावांमध्ये जमीन संपादनासाठी चुकीचे दर निश्चित करण्यात आले आहेत, त्या प्रकरणांचाही फेरआढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिवा तेलंग, वैभव दळवी, भारत पिंगळे, शेतकरी प्रतिनिधी दीपक हगवणे, अक्षय कातड, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, रवि पेखळे, मनीष हांडोरे, सागर लोणे, तुषार कोंबडे, गोकुळ बोराडे, उत्तम जाधव, संदीप पोरजे, तानाजी जाधव, रामभाऊ जाधव, सुरेश पाळदे, मधुकर पोरजे, धनाजी जाधव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT