राज्याच्या अ‍ॅग्रिगेटर पॉलिसीचे झाले काय; रिक्षाचालकांचा सवाल File Photo
नाशिक

Nashik Rickshaw Drivers | नाशिकच्या रिक्षाचालकांचा 'विवेक' जागा! रिक्षेवरील लिंबू-मिरची हटवून अंधश्रद्धेला दिला कायमचा फाटा

Nashik Rickshaw Drivers | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आयोजित राज्यस्तरीय फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी परिषदेनंतर नाशिकमधील काही रिक्षाचालकांनी अंधश्रद्धेविरोधात ठोस पाऊल उचलत आपल्या रिक्षांवरील लिंबू-मिरची काढून टाकत त्याचा त्याग केला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आयोजित राज्यस्तरीय फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी परिषदेनंतर नाशिकमधील काही रिक्षाचालकांनी अंधश्रद्धेविरोधात ठोस पाऊल उचलत आपल्या रिक्षांवरील लिंबू-मिरची काढून टाकत त्याचा त्याग केला. यापुढे अशा प्रथांना बळी न पडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नुकतीच पार पडलेली ही परिषद उत्साहात झाली. सीटू भवन परिसरात प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेले काही रिक्षाचालक उत्सुकतेपोटी परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेत 'लिंबू-मिरची तोडा, मंत्र-तंत्र सोडा, विवेकाशी नाते जोडा' हा संदेश देण्यात आला.

या विचारांनी प्रभावित होत चालकांनी तत्काळ कृती करण्याचा निर्णय घेतला. चांडक सर्कल परिसरात काही रिक्षाचालक एकत्र येत त्यांनी स्वतःच्या रिक्षांना बांधलेले लिंबू मिरची व काळ्या बाहुल्या काढून टाकल्या. तसेच भविष्यात अशा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याची प्रतिज्ञाही त्यांनी घेतली.

इतर रिक्षाचालकांनाही या अंधश्रद्धा सोडण्याचे आवाहन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही प्रथा पूर्वी अज्ञानातून रूढ झालेली असली, तरी आजच्या वैज्ञानिक युगात ती कालबाह्य ठरल्याचे मतही चालकांनी व्यक्त केले.

या उपक्रमात शरद भामरे, दिलीप देवरे, गणपत सोनवणे, विलास भेलके, प्रदीप सोरे, श्रीराम कुर्दळ, सीटू मंडल आदी रिक्षाचालक सहभागी झाले होते. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिंबू-मिरची ही खाण्याची वस्तू असून, अपघात किंवा दृष्ट लागण्याशी तिचा कोणताही संबंध नाही, हे आम्हाला पटले आहे. सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणेच महत्त्वाचे आहे.
- शरद भामरे, रिक्षाचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT