

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरासह परिसरातील १६ गावांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची योजना गेल्या १० ते १२ दिवसांपासून ठप्प झाली असून, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीजबिलाची मोठी थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण - झाली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वीजबिल भरून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र थकलेली रक्कम मोठी असल्याने पूर्ण रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. याचा फटका सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या लाभार्थी गावांना बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पाणीपुरवठा योजनेचे लाखो रुपयांचे वीजबिल थकलेले असून, महावितरणाने थेट कनेक्शन तोडल्याने लासलगावसह सर्व लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. ही योजना पूर्वीपासूनच ढिसाळ व्यवस्थापनामुळे चर्चेत होती. मात्र, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सुमारे २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत नवीन पाइपलाइन बसविण्यात आली होती.
आता वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रो फिटिंगमध्ये १६ गाव पाणी पुरवठा सोलर मंजूर झाले आहे. या कामाला गती देऊन लवकरात लवकर सोलर योजना करण्यात करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ वीजबिल थकल्यामुळे पाणीपुरवठा बंद होणे, ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव मधील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, तातडीने थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील १५ दिवसांपासून लासलगाव पाण्यापासून वंचित आहे. ग्रामपंचायतीने बिल भरलेले नाही. जनतेच्या भावनेशी चेष्टा सुरू आहे. सध्या गोणी कामगार महिलांना हाताला काम नाही. गोण्या बंद आहेत. उन्हाळा असल्यामुळे पिण्याचे वापरण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. वारंवार पाणी प्रश्न उद्भवत असून, आता गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर तत्काळ ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे
-स्मिता कुलकर्णी, ग्रामस्थ, लासलगाव
वीजबिलाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असला, तरी ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली आहे. मागील थकबाकी मोठी असल्याने ती अद्याप शिल्लक दिसत आहे. मात्र, प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक कार्यवाही सुरू असून, लवकरच लासलगावकरांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल.
- योगिता पाटील, सरपंच, लासलगाव