Nirmalya Collection  
नाशिक

Nashik Nirmalya Collection | नाशिककरांचे कौतुकास्पद पर्यावरणभान! नदीत निर्माल्य न टाकता पालिकेच्या 99 वाहनांकडे सुपूर्द

Nashik Nirmalya Collection | लाडक्या गणरायाला निरोप देताना नाशिककरांनी केवळ गणेशमूर्ती संकलनालाच प्रतिसाद दिला नाही, तर पूजेत वापरलेले निर्माल्यही नदीपात्रात न टाकता महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द केले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाडक्या गणरायाला निरोप देताना नाशिककरांनी केवळ गणेशमूर्ती संकलनालाच प्रतिसाद दिला नाही, तर पूजेत वापरलेले निर्माल्यही नदीपात्रात न टाकता महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द केले. गणेशविसर्जनाच्या कालावधीत शहरातील विविध विभागांतून तब्बल १५५.०१० टन निर्माल्य संकलित झाले. निर्माल्य संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेची तब्बल ९९ वाहने कार्यरत होती.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तींबरोबरच फुले, हार, दुर्वा, पाने तसेच अन्य पूजासाहित्य मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे महापालिकेने मूर्ती संकलनासोबतच निर्माल्य संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था केली होती. नागरिकांनी या व्यवस्थेचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीपात्रापासून दूर ठेवण्यात प्रशासनाला यश आले.

संकलनासाठी विशेष व्यवस्था:

विभागनिहाय आकडेवारीत पंचवटी विभागातून सर्वाधिक ४३.८२० टन निर्माल्य संकलित झाले. त्यानंतर सिडको विभागातून ३९.०९० टन, सातपूरमधून २८.४८० टन, नाशिकरोडमधून २४.४७० टन, नाशिक पश्चिमेकडून १५.९३० टन, तर नाशिक पूर्व विभागातून १२.१०० टन निर्माल्य संकलित केले. पंचवटी विभागातील निर्माल्य संकलनाचे प्रमाण सर्वाधिक राहिले. गोदावरी नदीकाठ तसेच परिसरातील गणेशविसर्जनाची मोठी परंपरा लक्षात घेता या विभागात महापालिकेने संकलनासाठी विशेष व्यवस्था केली होती.

निर्माल्यासाठी विविध भागांत वाहने:

निर्माल्य संकलनासाठी शहरातील विविध विभागांमध्ये एकूण ९९ वाहने तैनात केली होती. विसर्जनाच्या दिवशी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध ठिकाणी जमा होणारे निर्माल्य वेळोवेळी उचलून त्याची वाहतूक करण्यात आली.

प्रदूषण रोखण्यास हातभार:

गणेशमूर्तींच्या विसर्जनासोबत निर्माल्याचे विसर्जन हीदेखील नदी आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाची एक महत्त्वाची बाब मानली जाते. फुले, हार, पाने आणि अन्य पूजासाहित्य नदीत न सोडता संकलन केंद्रांवर देण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्याने १५५ टनांहून अधिक निर्माल्य जलस्रोतांपासून दूर ठेवले.

गणेशोत्सवातील भक्तिभाव कायम ठेवत पर्यावरणाचीही काळजी घेण्याचा नाशिककरांचा प्रयत्न यंदाच्या विसर्जन व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गणेशमूर्ती संकलनाबरोबरच निर्माल्य संकलनाचे वाढलेले प्रमाण शहरातील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करणारे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT