नाशिक : गंगापूर धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला आलेला पूर.  (छाया : रुद्र फोटो)
नाशिक

Nashik Rain | पावसाने दाणादाण 'गंगापूर' मधून विसर्ग : गोदेला पूर; आज 'येलो अलर्ट'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याला रविवारी (दि. ४) पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सततच्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आठ हजार क्यूसेकने विसर्ग केला जात असल्याने गोदावरीला पूर आला. तर जिल्ह्याच्या विविध धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचवटीत रामकुंड येथे पाय घसरून पडल्याने एक युवक गोदावरीच्या पुरात वाहून गेला. हवामान विभागाने सोमवारी (दि.५) जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.

नाशिक : पावसाने गोदामाई खळाखळी असून, गंगापूर धरणातून विसर्ग सुरु असल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे.

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असताना शुक्रवारी (दि.२) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातही पावसाने मुक्काम ठोकला आहे. रविवारी पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक शहर व परिसरात दिवसभर जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दिवसभर संततधार सुरूच आहे.

गंगापूर धरण व समूहातील वरच्या भागातील पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात झाली आहे. यंंदाच्या वर्षी प्रथमच गंगापूर धरण ८१ टक्के भरल्याने धरणातून विसर्ग साेडला जात आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इगतपुरीत पावसाचा जोर कायम असल्याने दारणासह भाम, कडवा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तर भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने काही गावांमध्ये ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्यात आले. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण आदी तालुक्यांमध्येही पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या भागातील धरणे भरण्यास मोठी मदत झाली आहे. जलसंपदा विभागाकडून पालखेड, चणकापूर, पुनदसह अन्य प्रकल्पांमधून विसर्ग सुरू केल्याने नद्या-नाले खळाळून वाहत आहेत. सुरगाण्यात चिंचदा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री मंगला बागूल या नदी पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. तसेच विविध तालुक्यांमध्ये घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्याला पुढील २४ तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत घाटमाथ्यासह काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गोदावरी नदीला पूर आल्याने दुकानातील साहित्य इतरत्र हलिवतांना किरकोळ विक्रेते.
जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदीकाठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेत आपली तसेच पाळीव प्राण्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेत. नागरिकांनीही सतर्क राहावे.
दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक.

जिल्ह्यातील पाऊस (मिमी)

  • मालेगाव २.३

  • बागलाण ४.९

  • नांदगाव १७.४

  • सुरगाणा ८८.१

  • नाशिक १५.२

  • दिंडोरी १९.४

  • इगतपुरी ५६.४

  • पेठ ९८.७

  • निफाड ७.९

  • सिन्नर ५.२

  • येवला ४.३

  • चांदवड २४.७

  • त्र्यंबकेश्वर ५९.८

  • देवळा १२.४

  • सरासरी २०.२

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT