पाऊस खबरबात ! पावसाचा जोर वाढला; ‘गोदावरी’ला हंगामातील पहिला पूर

नाशिककरांची पूर पाहण्यासाठी गर्दी; गंगापूर धरण 80 टक्के भरले
गोदावरी नदी पूर
नाशिक : गंगापूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपासून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने हंगामात प्रथमच गोदाघाट असा पाण्याखाली गेला होता. (छाया : रुद्र फोटो)
Published on
Updated on

नाशिक : शहर व परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांवर पाेहोचल्याने प्रकल्पातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदावरीला पूर आला. ही जलक्रीडा पाहण्यासाठी नाशिककरांनी सहकुटुंब गोदाकाठावर गर्दी केली.

Summary
  • सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या कमरेला लागले पाणी

  • गोदाघाटावरील सांडवे पाण्याखाली

  • शहरवासीयांनी लुटला पावसाचा आनंद

  • सोमेश्वर धबधबा, तपोवन परिसरात गर्दी

शहरात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. रविवारी पहाटेपासूनच त्याचा जोर अधिक वाढला. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. तर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा प्रथमच साठा ८० टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दुपारी १२ वाजता ५०० क्यूसेक वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करताना दुपारी चार वाजता हा विसर्ग चार हजार क्यूसेकपर्यंत होऊन गोदावरीला पूर आला. अवघा गोदाघाट पाण्याखाली गेला आहे. प्रमुख सांडव्यांवरून पाणी वाहत असल्याने नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले. रामकुंडाचा परिसरही पाण्याखाली गेल्याने दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले. तर यंदा प्रथमच गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने पूर पाहण्यासाठी शहरवासीयांनी गोदाघाटावर गर्दी केली. अहिल्याबाई होळकर पूल, रामकुंड परिसर, रामसेतू पूल, बालाजी कोट, गाडगे महाराज पूल तसेच अन्य भागही गर्दीने फुलून गेला.

मनपाकडून इशारा

गोदाघाटावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे सावधानतेचा इशारा देण्यात आला. पाण्याचा वाढता वेग लक्षात घेता काठावरील टपरीधारक, दुकानदार तसेच छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून टपऱ्या व व्यावसायिक माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठीची लगबग सुरू होती.

शहरात वाहतूक कोंडी

संततधार पावसाचा वाहतुकीला फटका बसला. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने तसेच महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. शरणपूर राेड, राजीव गांधी भवनासह मुख्य परिसरांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news