नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला असला, तरी अनेक भागांत रिपीटेड सायकलमध्ये झालेला पाऊस, पश्चिम भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आणि नद्यांना असलेला विसर्ग यामुळे परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिली आहे. मात्र, नांदगाव, येवला, मालेगाव तालुक्यांसह जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी रब्बी हंगाम संकटात सापडण्याची शक्यता असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा रब्बीचे क्षेत्र काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी पावसात मोठा खंड पडलेला नाही. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला. पश्चिम आणि मध्य नाशिकमधील बहुतांश धरणे भरलेली असल्याने नदी नाल्यांमध्येही पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न तुलनेने गंभीर नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाण्याचा विचार करूनच पीक नियोजन करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदा वितरित करण्यात आलेल्या चारबियांची लागवडही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकारी आणि तहसीलदारांना प्रत्यक्ष पाहणीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत
काही मंडळांमध्ये पावसाची चिंता
जिल्ह्यातील एकूण परिस्थिती नियंत्रणात असली, तरी काही मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. त्यामुळे या भागांतील रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता हा प्रमुख प्रश्न ठरणार आहे. शासनाच्या निकषांनुसार संबंधित भागांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनानेही आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
पाणी, चारा टंचाईचे नियोजन
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत, गावनिहाय पाणीपुरवठा आणि विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती तसेच उद्योगांसाठी आवश्यक पाण्याचे स्वतंत्र नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास, त्याबरोबरच चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याबाबतही मंडळनिहाय नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.