MP Rajabhau Waje Pudhari File Photo
नाशिक

MP Rajabhau Waje | नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अद्याप अंतिम नाही; खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्पष्टीकरण

MP Rajabhau Waje | खासदार राजाभाऊ वाजे : काकोडकर समितीच्या अहवालानंतरच निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे रेल्वेबाबत सध्या प्रसिद्ध होत असलेल्या काही वृत्तांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिर्डीमार्गे नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम मार्ग निश्चित झाला असून, संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, असे ठाम मत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले.

नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुरुवातीला नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण-पुणे असा थेट मार्ग प्रस्तावित होता. मात्र, नारायणगावजवळील खोडद येथील जीएमआरटी प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक कार्यावर संभाव्य परिणामाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या मार्गाबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर पर्यायी मार्गांचा विचार सुरू झाला.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समिती विविध पर्यायांचा तांत्रिक व शास्त्रीय अभ्यास करून अहवाल देणार आहे. हा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसताना कोणताही मार्ग अंतिम झाल्याचे सांगणे योग्य नाही, असे खासदार वाजे यांनी सांगितले.

नाशिक-शिर्डीचा सुमारे ९५ किमी मार्ग आणि अहिल्यानगर-पुणे सुमारे १३३ किमी मार्ग हे स्वतंत्र टप्पे आहेत. या मार्गांची डीपीआर किंवा भूसंपादन प्रक्रिया पुढे गेली असली, तरी त्यावरून संपूर्ण नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही.

जीएमआरटीसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पाचे संरक्षण झाले पाहिजे. त्याचवेळी जीएमआरटीचे कार्य अबाधित ठेवून नाशिक-पुणे रेल्वेचा थेट मार्ग शक्य आहे का, याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. बोगदा, उन्नत मार्ग, संरेखनातील बदल यांसह सर्व तांत्रिक पर्याय तपासून व्यवहार्य मार्ग निश्चित करावा, अशी मागणी खासदार वाजे यांनी केली.

नाशिक-पुणे रेल्वे ही नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या उद्योग, शेती, रोजगार, शिक्षण आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे काकोडकर समितीचा अहवाल आल्यानंतर तांत्रिक व्यवहार्यता आणि व्यापक जनहित लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, असे खासदार वाजे यांनी स्पष्ट केले.

"नाशिक-पुणे रेल्वे हा नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काकोडकर समितीचा अहवाल येण्यापूर्वी कोणताही मार्ग अंतिम झाल्याचे सांगणे योग्य नाही."
— भास्कर भगरे, खासदार
"'जीएमआरटी'चे संरक्षण आणि नाशिक-पुणे रेल्वे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे घाईघाईने कोणताही मार्ग अंतिम न करता काकोडकर समितीचा अहवाल आणि सर्व तांत्रिक पर्यायांचा विचार करून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे."
— राजाभाऊ वाजे, खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT