नाशिक : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात संघर्ष समितीच्या वतीने शालीमार येथे आयोजित मोर्चात सहभागी आंबेडकरी जनता. (छाया: हेमंत घोरपडे) 
नाशिक

Reservation Sub-Classification Protest - 'उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण संरक्षणासाठी एकजूट टिकवा'

अनुसूचित जातींनी भव्य मोर्चातून सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण संरक्षणासाठी एकजूट कायम ठेवा', 'आरक्षण आमचा हक्क आहे', अशा जोरदार घोषणा देत आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

गोल क्लब ईदगाह मैदानापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हा परिषद, अण्णा भाऊ साठे पुतळा, शालिमारमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिला, युवक आणि युवतींची मोठी उपस्थिती होती. अनुसूचित जार्तीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करीत, उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अनुसूचित जातींमधील ५९ जार्तीचे आरक्षण एकत्रित ठेवावे आणि आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चाला संबोधित करताना वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही एका जातीसाठी अथवा समुदायासाठी आरक्षणाची भूमिका घेतली नाही, तर अनुसूचित जातींमधील विविध घटकांना सामावून घेत सामाजिक न्यायाची व्यवस्था उभी केली, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न मान्य केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

मोर्चातील गर्दी कोणत्याही एका जातीच्या किंवा समाजाच्या विरोधातील नसून, उपवर्गीकरणाविरोधातील असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. समाजात जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेडकरी जनता तो हाणून पाडेल, असा इशाराही देण्यात आला. भविष्यात अनुसूचित जमाती तसेच ओबीसी आरक्षणातही अशाच प्रकारे उपवर्गीकरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

यावेळी आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी अर्जुन पगारे, प्रकाश पगारे, चेतन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, आकाश भालेराव नगरसेवक राहुल दिवे, वैशाली दाणी, पल्लवी गांगुर्डे, माजी नगरसेवक कुणाल वाघ, अण्णासाहेब कटारे, उत्तमराव आढाव, देवानंद काळे, अमोल पगारे, संतोष सोनपसारे, संजय भालेराव, श्रावण वाघ, भंते सुगत, नागसेन, बुद्धश्री, चर्मकार संघटनेचे श्रावण वाघ, खाटीक संघटनेचे रमेश जाधव, मुकुंद काळे, सनी रोकडे, दीपक डोके, गायक सिद्धार्थ जोंधळे, बाळासाहेब शिंदे आणि माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोर्चादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाच्या संरक्षणासाठी तयार झालेली 'वज्रमूठ' कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारी नोकऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमध्येही आरक्षणाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. मोर्चा शांततेत पार पडला.

आंबेडकरी जनतेचा प्रतिसाद

मोर्चाला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेने प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शालिमार परिसरामध्ये ईदगाह मैदानावर मोर्चेकऱ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. शालिमार येथील आंबेडकर पुतळ्याच्या आजूबाजूच्या इमारतींवरही निळे झेंडे घेऊन मोर्चेकरी उमे असलेले दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT