Digital Preservation of Rare Manuscripts | दुर्मीळ हस्तलिखितांना मिळणार 'डिजिटल' संरक्षण

दुर्मीळ हस्तलिखितांना मिळणार 'डिजिटल' संरक्षण
Digital Preservation of Rare Manuscripts
Digital Preservation of Rare Manuscripts
Published on
Updated on

नाशिक : ऐतिहासिक व दुर्मीळ हस्तलिखिते आणि ग्रंथांचे जतन, संवर्धन व डिजिटायझेशन करण्यासाठी राज्य शासनाने व्यापक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. ग्रंथालय संचालनालयाच्या हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. यात राज्यातील दुर्मीळ साहित्य पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याबरोबरच ते सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला होता.

नव्या पिढीला भारतीय समृद्ध ग्रंथ संस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने, ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मोडी लिपी व देवनागरी तज्ज्ञ अच्युत पालव, संस्कृती संग्रहालय संशोधन व अभ्यास केंद्राच्या संचालिका तेजस्विनी पाठक, प्रा. अभिजित दांडेकर, राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते. बैठकीत ग्रंथालय संचालनालयाकडील हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथ राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात हस्तांतरणास समितीने मंजुरी दिली आहे. कलिना येथील इमारतीत या साहित्याच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहे.

सध्या संचालनालयाकडे १२६ हस्तलिखिते असून, त्यांच्या छाननीसाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर डिजिटायझेशन केले जाईल. मोडी आणि जुन्या हस्तलिखितांचा वारसा केवळ जतन करून ठेवण्यापेक्षा तो लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या ठेव्याचे डिजिटायझेशन करत त्यावर संशोधन झाले पाहिजे. १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या शतकांतील कागद, हस्तलिखिते पायायाची उत्सकता सर्वसामान्यांमध्ये आहे. मोडी लिपी व सुलेखनकार पद्मश्री अच्यु पालव यांनी हस्तलिखितांचे शास्त्रोक्त वर्गीकरण करीत त्यांचे आकर्षक स्वरूपात डिजिटायझेशनची सूचना बैठकीत केली. 'नुसता ठेवा जतन करून उपयोग नाही, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे' असे त्यांनी सांगितले. गावागावांतून दुर्मीळ हस्तलिखितांची माहिती संकलित करीत त्याचे प्रदर्शन भरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

'ग्रंथ संजीवनी' पोर्टलद्वारे दुर्मीळ ग्रंथ, वार्तापत्रे आणि नियतकालिके वाचकांना उपलब्ध होत आहेत. एशियाटिक सोसायटीतील ३१ हजार दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. अच्युत पालव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सर्वप्रथम हस्तलिखितांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशनही करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे डिजिटायझेशन कायात रोईला मामले पुढील पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे ज्ञान सहज उपलब्ध होणार आहे. दरम्यान, 'ज्ञान भारतम्' अॅपवर राज्यातील १६ हजारांहून अधिक हस्तलिखितांची नोंद झाली आहे. 'ग्रंथ संजीवनी' पोर्टलद्वारे डिजिटायझेशन केलेले ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, एशियाटिक सोसायटी, मराठी राज्य विकास संस्थेचे सहकार्य घेऊन डिजिटायझेशनला गती देण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'जनरेशन झेड'ला या समृद्ध ग्रंथसंस्कृतीशी जोडण्यावरही समितीने भर दिला आहे.

पर्यटनाच्या धर्तीवर प्रदर्शन भरवल्यास गावागावांत जतन केलेली हस्तलिखिते आणि त्यासंबंधीची माहिती पुढे येऊ शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचाही सहभाग वाढेल. हा अमूल्य वारसा सर्वांसाठी खुला करून त्याचे दस्तावेजीकरण करणे आवश्यक आहे. केवळ ठेवा जतन न करता, त्याचा अभ्यास, संवर्धन आणि प्रसार होणे महत्त्वाचे आहे.

- अच्युत पालव, मोडी लिपी अभ्यासक

राज्यातील हस्तलिखित ग्रंथांचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशनला शासनाने गती दिली आहे. 'ज्ञान भारतम्' अॅपवर १६ हजारांहून अधिक ग्रंथांची नोंद झाली आहे. सार्वजनिक वाचनालय, मंदिर, संस्था, ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखितांची छाननी करण्यात येणार आहे. येत्या आठ महिन्यांच्या छाननीनंतर टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशन केले जाईल.

- अशोक गाडेकर, ग्रंथालयप्रमुख संचालक, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news