Pre Monsoon Rain Update 
नाशिक

Pre Monsoon Rain Update | जिल्ह्यात वळवाची दमदार सलामी

Pre Monsoon Rain Update | बळीराजा सुखावला : उकाड्यापासून सुटका; मशागतीच्या कामाला येणार वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एरवी मे महिन्याच्या अखेरीस बरसणाऱ्या वळवाच्या पावसाने जून महिन्याच्या दुसऱ्याच तारखेला दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह बरसलेल्या पावसाने अवघ्या काही मिनिटातच दाणादाण उडवून दिली. जिल्ह्यात २८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारच्या सुमारास बरसलेल्या दमदार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, बळीराजादेखील सुखावला आहे.

पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाना वेग येणार असून, मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा आहे. या वर्षी नाशिकने विक्रमी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत उष्णतेचा पारा गाठल्याने, उष्णतेची दाहकता असह्य झाली होती.

मागील काही दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले असले तरी, उकाडा कायम होता. अशात मंगळवारी (दि.२) वळवाच्या पावसाने जिल्हाभर लावलेल्या हजेरीमुळे दिलासा मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

रात्री उशिरापर्यंत पाऊस टप्प्याटप्प्याने बरसत होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दोन गायी, एक बैल ठार चांदवड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात बहादुरी येथील शेतकरी संजय अशोक पवार यांच्या दोन गायी तर दुधखेड-नवापूर येथे शेतकरी अशोक एकनाथ महाले यांचा एक बैल वीज पडून ठार झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बहादुरी, चिखलआंबे, बोराळे आदी गावांमध्ये पाऊस झाला.

खोदकामाचा ट्रेलर

नाशिकमध्ये केलेल्या खोदकामाचे दुष्परिणाम पहिल्याच पावसात समोर आले. शहरातील प्रमुख रस्ते चिखलमय झाले होते. याशिवाय बऱ्याच भागांत खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. पहिल्याच पावसाने नाशिकची अवस्था दयनीय केल्याने,' ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है' अशा स्वरूपाच्या मिम्स समाजमाध्यमांवर व्हायरल केल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT