Diesel Shortage | डिझेलटंचाईने बागलाणात शेती संकटात

Diesel Shortage | जायखेड्यासह परिसरातील गावांमध्ये मशागतीची कामे ठप्प
Petrol-Diesel Shortage
Petrol-Diesel Shortage Pudhari
Published on
Updated on

जायखेडा : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह मोसम खोरे परिसरात डिझेलटंचाईने गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला होता. मात्र ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेले डिझेल वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

Petrol-Diesel Shortage
Nashik Ashok Kharat Case | भोंदू खरातच्या ज्योतिषशास्त्राने यंत्रणाही चक्रावल्या

परिणामी शेतकऱ्यांची धावपळ, चिंता आणि आर्थिक अडचणी वाढत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, शेतीमालाला न मिळणारा योग्य बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च आणि मजुरीचे वाढते दर यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता डिझेलटंचाईचा फटका बसत आहे.

खरीप हंगामासाठी शेत तयार करण्याची ही अत्यंत महत्त्वाची वेळ असताना इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने मशागतीच्या कामांचा वेग मंदावला असून, अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडली आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोलपंपांसमोर सकाळपासून ट्रॅक्टर व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी डिझेल संपल्याचे सांगितले जात असल्यामुळे चालकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे.

तासन्तास प्रतीक्षा करूनही डिझेल मिळाले नसल्याने शेतकरी व ट्रॅक्टरचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेत मशागतीसाठी तयार आहे. पावसाची वेळ जवळ आली आहे; मात्र, डिझेल नसल्यामुळे कामे थांबली आहेत. पेरणी उशिरा झाली, तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून डिझेलपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ट्रॅक्टरधारकांनी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. शेतीकामांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच कर्जाचे हप्ते व उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद असल्याने त्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. दिवसभर पंपांवर फिरूनही डिझेल मिळत नाही. कामे बंद असल्याने उत्पन्न थांबले आहे. बँकेचे हप्ते, घरखर्च आणि मुलांचे शिक्षण कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भावना एका ट्रॅक्टरचालकाने व्यक्त केली.

Petrol-Diesel Shortage
Mapusa Fish Market | म्हापसा मासळी मार्केटची दुरवस्था; गोवा कॅनकडून चिंता

प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांवर डिझेलचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा, शेतकरी व ट्रॅक्टरधारकांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

आम्ही रात्रंदिवस कष्ट करून शेती करतो. पिकासाठी रक्ताचे पाणी करतो; मात्र दरवर्षी नवे संकट समोर उभे राहाते. कधी निसर्ग दगा देतो, कधी बाजारभाव कोसळतात, तर आता डिझेलटंचाईमुळे शेतीच ठप्प झाली आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वेळेत मशागत व पेरणी न झाल्यास पुन्हा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news