नाशिक : खड्डेमय रस्त्यांमुळे महापालिकेवर टीकेची झोड उठत असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने गुणवत्ताहीन रस्त्यांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाला जबाबदार धरले आहे. बांधकाम विभागाने गुणनियंत्रण विभागाला पत्र देत कोणत्याही कामाच्या दर्जा तपासणीची जबाबदारी गुणनियंत्रण विभागाची असल्याची जाणीव करून दिली आहे. यापुढे कामाचा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित अभियंतांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराच गुणनियंत्रण विभागाला देण्यात आला आहे.
शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून महापालिकेत महाभारत सुरू आहे. पालकमंत्र्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर बांधकाम विभागाने गुणनियंत्रण विभागाकडे अंगुलीनिर्देश करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी गुणवत्ता नियंत्रण विभागाला खरमरीत पत्र पाठवले असून, त्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. देखभाल दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्वक दर्जेदार व निविदा निकषांनुसार करणे अपेक्षित आहे. ही संपूर्ण जबाबदारी गुणवत्ता नियंत्रण विभागाची आहे. मात्र त्यानंतरही रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी आल्या असून, रस्ते दुरुस्ती अंतर्गत खड्डे बुजवणे, ओघळ्या व पॅचवर्कची कामे निविदा अटीशर्तींनुसार होत नसल्यामुळे त्याची जबाबदारी क्षेत्रीय स्तरावरील अभियंत्यांचे असल्याची जाणीव करून दिली आहे.
रस्ता दुरुस्ती कामांमध्ये अनियमितता झाली किंबहुना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे नसतील, तर यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधित क्षेत्रीय स्तरावर पर्यवेक्षण करणाऱ्या गुणनियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिला आहे.
रस्ता कामांचा दर्जा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे काम गुणवत्ता नियंत्रण विभागाचे आहे. गुणनियंत्रण विभागाच्या कामाची फेरतपासणी करणे गरजेच आहे. यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे पत्र दिले आहे.संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका.