शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्ते बांधणीवर खर्च करते. मात्र, त्यानंतरही पावसाळा आणि खड्ड्यांचे कोडे काही आजतागयत सुटलेले नाही. रस्त्यांचा दर्जा आणि आयुर्मान वाढण्यासाठी अलीकडे काँक्रीटचे रस्ते तयार करण्यावर भर दिला जात आहे. तरी देखील त्या प्रयोगात खड्डेमुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यात पूर्णत: यश आल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर नियमाप्रमाणे शास्त्रोक्त रस्ता कसा तयार करायला हवा मात्र, प्रत्यक्षात काय होते ज्यामुळे रस्त्यांची काही दिवसांतच 'वाट' लागते, यावर प्रकाश टाकणारी ही मालिका.
सर्वसाधारणपणे रस्त्याचे पाच प्रकार पडतात. व्हीआर (व्हिलेज रोड) अर्थात ग्रामीण रस्ते, तर दुसरा ओडीआर (ऑदर डिस्ट्रिक्ट रोड) इतर जिल्हा मार्ग, तिसरा मेजर डिस्ट्रिक्ट रोड (मुख्य जिल्हा रस्ता), चौथा स्टेट हायवे, तर पाचवा नॅशनल हायवे. कुठलाही एक किलोमीटरचा डांबरी रस्ता बनविताना साधारणत: ८० लाख रुपये खर्च येणे अपेक्षित असते. तर याच्या दुप्पट अर्थात दीड कोटी रुपये सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्यासाठी लागतात. डांबरी रस्त्याचे आयुर्मान साधारणपणे पाच वर्षे, तर काँक्रीट रस्त्याचे २० ते २५ वर्षे असते. रस्त्यांचे लवचिक (फ्लेक्सिबल) व टणक (रिजिड) असे दोन प्रकार पडतात. डांबरी रस्ते हे फ्लेक्सिबल, तर काँक्रीटचे रस्ते हे रिजिड प्रकारात मोडतात.
प्रकारानुसार प्रथम डांबरीकरण रस्त्याची बांधणी पद्धत आणि प्रत्यक्षात होणारे काम हे जाणून घेऊ...
प्रथम जमिनीवरचा थर हा साधारणत: ४ फुटांपर्यंत खोदला जातो. खोदकामानंतर त्यात कठीण मुरूम टाकून त्याची लेव्हलिंग केली जाते. मुरमाचा वरचा थर हा साधारणत: ८ ते १० इंचाचा असायला हवा. रस्त्यावरून दररोज किती वाहने धावतील याचा अंदाज काढून जीएबी (ग्रॅन्युअर सबबेस) अर्थात डांबरमिश्रित खडीचा थर टाकण्यात येतो. यानंतर मॉडिफाइड पॅनिट्रेशन मॅकॅडम (एमपीएम) यामध्ये ५० ते ७५ एमएम जाडीचा डांबरमिश्रित थर टाकण्यात येतो. यानंतर बिटूमिनस मॅकॅडमचा (बीएम) ५० ते ८० एमएम जाडीचा लहान खडीचा थर टाकला जातो. त्यावर कार्पेट अर्थात २० एमएम जाडीचा थर टाकण्यात येतो. रस्ता गुळगुळीत व्हावा, रस्त्यावर अंथरलेली खडी व कच घट्ट पकडून ठेवण्यासाठी रस्ता सीलकोट करणे गरजेचे असते. प्रत्येक थराची दबाई करणे आवश्यक आहे.
रस्त्याच्या पृष्ठभागाची जाडी जाणूनबुजून कमी ठेवली जाते. त्यात पावसाच्या पाण्यास गटारीमार्फत योग्यप्रकारे वाट दिली जात नाही. या मुख्य कारणांमुळे खड्डे पडतात. वाहनांची संख्या आणि वजनक्षमता यामुळेवी खड्डे पडतातण पाण्याला वाट देण्यासाठी रस्त्यांच्या कडेने चारी करणे अपेक्षित असते. मात्र, खर्च टाळण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी झिरपलेल्या पाण्यामुळे आतल्या थरांची बांधणी विस्कटते. मखमलाबाद, सिडको सारख्याठिकाणी काळी माती भरपूर प्रमाणात असून काळ्या मातीमुळे रस्ते टिकत नाहीत.
(क्रमश:)