शहरात सध्या 80 टक्के रस्त्यांची वाट लागल्याचे दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा का होते हा प्रश्नचिन्ह आजही प्रत्येक नाशिककरांच्या मनात आहे. प्रशासन आणि कंत्राटदार यांनी प्रामाणिकपणे रस्ता तयार केला तर पावसातही रस्ता तग धरुन राहु शकतो. यासाठी रस्ता तयार कसा करतात हे आपण बघू या.
व्हीआर रोड अर्थात ग्रामीण रस्त्याची रुंदी तीन मीटर तर शहरी रस्त्याची रुंदी साधारणत: पावणेचार मीटर असते. कॅरेज वे अर्थात रस्त्याच्या ज्या भागावरुन प्रत्यक्षात वाहने मार्गक्रमण करतील ती रुंदी. तीन मीटरच्या डाव्या व उजव्या बाजूने दीड मीटरचे साईड शोल्डर आणि दीड मीटरची गटर सोडली जाते. शहरी आणि ग्रामीण अर्थात शहरालगतच्या रस्ता सर्वसाधारणपणे 12 मीटर रुंदीचा अपेक्षित असतो.
ओडीआर अर्थात शहरालगत पावणेचार मीटरचा रस्ता तयार केला जातो. रस्ता खोदकाम झाल्यानंतर ग्रेड एकचा अर्थात डब्ल्यूबीएमचा 75 एमएमचा थर दिला जातो. बीबीएमचा (बिटविन बाउंड मॅकाडम) अर्थात मुरमाचा थर दिला जातो. पाणी मारून रोलिंग केले जाते. हा थर 50 एमएम किंवा 75 एमएमचा असतो. यावर पुन्हा खडी पसरवली जाते. रस्त्याचे खोदकाम करताना काळी माती जास्त असल्यास डब्ल्युबीएम, बीबीएम थराची जाडी वाढविली जाते.
व्हीआर किंवा ओडीआर रस्ता बनवितांना पैसे वाचविण्यासाठी डब्ल्युबीएम किंवा बीबीएम थराची जाडी कमी ठेवली जाते. थराची जाडी कमी अन् वाहनांची संख्या तसेच वजनाचे प्रमाण जास्त सोबतच अतिवृष्टी यामुळे रस्ते उखडतात. अनेक ठिकाणी कॅरेज वेच्या बाजुने साईड शोल्डर अन् गटर सोडले जात नाही. यामुळे वाहनांना पास होतांना जागा मिळत नाही. परिणामी वाहनांच्या वजनामुळे रस्त्यांच्या कडेला खड्डे पडतात. रस्त्यांना डाव्या बाजूला उतार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या पृष्ठभागावरच साचते. यामुळे पाणी रस्त्यात मुरते. परिणामी खालचा थर उखडला जाऊन रस्त्याला खड्डे पडतात.