नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील खड्ड्यांचा प्रश्न केवळ वाहतुकीच्या गैरसोयीपुरता राहिलेला नसून, तो थेट जिवावर बेतत आहे. मागील तीन दिवसांत खड्डे आणि चिखलामुळे तिघांचा बळी गेल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या बांधकाम विभागाने शहरात तब्बल १७ हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे; मग हे १७ हजार खड्डे नेमके कुठे बुजविले, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर आजही मोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी दिसत असल्यामुळे प्रशासनाचा दावा आणि रस्त्यांवरील वास्तव यात मोठी तफावत दिसत आहे.
मागील महिनाभरापासून शहरात खड्ड्यांचा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनावर टीका होत असताना विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने केली.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मनपा अधिकारी - कर्मचाऱ्यांनी शहरभर खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात आले; मात्र, पावसाने पुन्हा रस्त्यांची अवस्था उघडी पाडली असून, अनेक भागांतील खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सध्या गणपतीचे आगमन होत असल्याने खड्ड्यांमधून गणपती बाप्पाला घरी आणणेही खूप अवघड झाले आहे.
त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीजवळ बुधवारी चिखलात दुचाकी घसरून २५ वर्षीय प्रतीक्षा ईंपाळ यांचा मृत्यू झाला. चिखलातून मार्ग काढताना ही घटना घडली. या आधी दोन दिवसांपूर्वी जेल रोड परिसरातील ४२ वर्षीय सुजित गायकवाड यांचा सातपूर परिसरात खड्ड्यात दुचाकी पडल्याने मृत्यू झाला.
सलग दुर्घटनांमुळे रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली. खड्ड्यांमुळे एकूण १० व्यक्तींचा मृत्यू झाला असून, सातपूरमध्ये ६ व्यक्तींना जीव गमावावा लागला आहे.
मखमलाबाद रोडची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलाखाली खड्डे झाकले जात असल्याने अंदाज येत नाही. दुचाकी खड्ड्यात आदळण्याची शक्यता असते. या मार्गावर वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच, बुधवारी (दि. २) सकाळी अंबड परिसरात ट्रकचे चाक फसल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात गंभीर दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
गंगापूर रोडवरील काही खड्डे बुजवण्यात आले असले, तरी शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अद्यापही चिंताजनक आहे. भोईर मळा, वडाळाई मातानगर, मखमलाबादकडून गंगापूर रोडकडे येणारा मार्ग, जत्रा हॉटेल ते मेडिकल फाटा, नांदूर नाका ते दसक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
बांधकाम विभागाने शहरात १७ हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला. हा आकडा मोठा असला, तरी प्रत्यक्ष रस्त्यांवर परिस्थिती वेगळीच दिसत आहे. खड्डे बुजवण्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि बुजविलेले खड्डे पुन्हा उखडण्याचे प्रमाण याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ खड्ड्यांत माती, मुरूम किंवा डांबराचा थर टाकण्याऐवजी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करण्याची गरज आहे.
शहरातील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. प्रशासनाकडून तातडीने उपाययोजनांचे आश्वासन दिले जाते. मात्र, काही दिवसांनी पुन्हा रस्त्यांची तीच अवस्था होते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे बुजवण्याचे काम केवळ कागदावरील आकडेवारीत न राहता, प्रत्यक्ष रस्त्यांवर दिसणे गरजेचे आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्याच्या कामावर सातत्याने देखरेख ठेवणे, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणे आणि धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे; अन्यथा १७ हजार खड्डे बुजविल्याच्या दाव्यापेक्षा रस्त्यांवरील बळींची संख्या मोठी होऊ नये, हीच अपेक्षा नाशिककरांची आहे.