नाशिक : येथील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न राज्याच्या विधिमंडळात पोहोचला आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी अधिकारी, ठेकेदाराच्या संगनमताने होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचा आरोप करत रस्तेकामांची चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे पावसाळी अधिशनात केली आहे.
आ. फरांदे यांनी या लक्षवेधीद्वारे नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांचे हाल होत आहेत. इंडियन रोड काँग्रेस(आयआरसी)च्या निकषांनुसार रस्ता तयार केल्यानंतर १५ ते २० वर्षे तो चांगल्या स्थितीत असायला हवा. या रस्त्यांचा डिफेक्ट लायबिलीट पिरियड पाच वर्षे अर्थात या कालावधीत रस्ते दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असायला हवी. मात्र अधिकारी, ठेकेदारांचे साटेलोटे असल्याने लायबिली पिरियडमधील रस्ते दुरुस्तीवरही महापालिकेकडून कोट्यवधींचा खर्च केला आहे. ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नाही. कार्यालयात बसून रस्त्यांची गुणवत्ता तपासली जाते. बोगस बिले काढली जातात. मात्र यावर अधिकाऱ्यांचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातून महापालिकेच्या कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर महापालिकेची प्रतिमादेखील मलिन होत आहे. त्यामुळे रस्ते कामांची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. फरांदे यांनी या लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे.
आमदार फरांदे यांनी खड्ड्यांवर लक्षवेधी सूचनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सभागृहात निवेदन केले जाणार आहे. या प्रकरणात विलंब झाल्यास कारवाईचा इशारादेखील कार्यासन अधिकारी मो. क. बागवान यांनी पत्राद्वारे दिला आहे.