Nashik | खड्ड्यांचा प्रश्न पेटला ! शिवसेना उबाठा गटाने घोटी टोल नाका अडवला
इगतपुरी : घोटी टोल नाका परिसरात उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गेल्या एक तासापासून आंदोलन करत टोलनाका बंद केल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. शिवसैनिकांनी घोटी टोल नाका अडवला असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
घोटी टोल नाका परिसरामध्ये माजी आमदार निर्मला गावित, वसंत गिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहे. आमदार निर्मला गावित यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित आहेत. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे होणारे अपघात थांबावेत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्त्यांचा देखील आंदोलनात मोठा सहभाग आहे.
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी विना टोल वाहने सोडले. मुंबई नाशिक अंतर खड्ड्यांमुळे सहा ते सहा तास लागत असल्यामुळे अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे टोल न घेण्याची मागणी करून टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. विशेष म्हणजे आंदोलक व वाहन धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचेही दिसून आले.

