निखिल रोकडे, नाशिक
नाशिक शहरात वर्षभरात तब्बल ४६ खुनांच्या घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. पंचवटी, सातपूर, कॉलेज रोड गोळीबार, राहुल धोत्रे हत्याकांड, जाधव बंधू हत्याकांड या घटना केवळ नाशिकच नव्हे, तर देश व राज्यभर चर्चेत राहिल्या. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेली 'नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला' ही विशेष मोहीम गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ ठरली. शहरातील गुन्हेगारी साम्राज्य अक्षरशः भुईसपाट झाल्याचे चित्र वर्ष अखेरीस नाशिक शहरात दिसून आले. कर्णिक त्यांच्या कारवाईमध्ये विशेष म्हणजे सर्वपक्षीय राजकीय गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीसुद्धा यामधून वाचू शकले नाहीत.
या मोहिमेसाठी आयुक्त कर्णिक यांनी स्वतंत्र आणि प्रभावी पथकांची रचना केली. पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली 'बालेकिल्ला' मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. राजकीय दबाव, टोळी दहशत किंवा सराईत गुन्हेगारांची भीती न बाळगता तपास, अटक आणि कठोर कारवाई करण्यात आली.
रंगपंचमीच्या दिवशी आंबेडकरवाडी येथे उमेश व प्रशांत जाधव या भावांची कोयत्याने निघृण हत्या झाली. सुरुवातीला तपासावर प्रश्न उपस्थित झाले; मात्र आयुक्त कर्णिक यांनी विशेष तपास पथक स्थापन करून हा तपास वर्ग केला. परिणामतः या प्रकरणातील सर्व आरोपी आजही कारागृहात आहेत.
पंचवटी, सातपूर, कॉलेज रोड आणि राहुल धोत्रे हत्याकांड या घटना वर्षभर गाजल्या. पंचवटीतील सागर जाधव गोळीबार प्रकरणात माजी नगरसेवक जगदीश पाटील आरोपी ठरले. राहुल धोत्रे हत्याकांडात माजी नगरसेवक उद्धव निमसे सप्टेंबरपासून कारागृहात आहेत. सातपूर गोळीबार प्रकरणात सराईत गुन्हेगार भूषण, प्रिन्स व प्रकाश लोंढे यांच्यावर 'मोका' अंतर्गत कारवाई झाली. कॉलेज रोड गोळीबारात भाजप कामगार नेते सुनील बागुल यांचे नातेवाईक आरोपी ठरले. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही कठोर कारवाई करण्यात आल्याने पोलिसांची भूमिका स्पष्ट झाली. पोलिस आयुक्तालयाने राबवलेल्या मोहिमेमुळे वरील घटनांमधील आरोपी अनेक महिन्यांपासून कारागृहात आहे. यामुळे 'बालेकिल्ला' मोहिमेची विश्वासार्हता अधोरेखित झाली.
४६ खुनांनंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर 'कायद्याचा बालेकिल्ला' मोहीम अधिक आक्रमक झाली. गुन्हेगारांना पोलिस खाक्या दाखवत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देऊन व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. परिणामी, गुन्हेगारांचे पाठीराखे, कार्यकर्ते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज परिस्थिती अशी आहे की, अनेक सराईत गुन्हेगार कारागृहात, काही फरार तर उर्वरित भूमिगत झाले आहेत. एकेकाळी अस्वस्थ दिसणारे नाशिक शहर आता तुलनेने शांत दिसू लागले आहे. कायद्याची दहशत आणि पोलिसांची निर्णायक भूमिका यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.