

निखिल रोकडे
नाशिक : हिंदी चित्रपट ‘शोले’मधील अमर्याद प्रसिद्ध संवाद ‘बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जायेगा’ आपल्याला आठवतोय का? आज नाशिक शहरात या संवादाचा नवा अवतार ऐकू येतो. ‘भाई शांत रहो, नही तो कर्णिक आयेगा!’ कारण, नाशिक शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडाकेबाज मोहिमेमुळे गुन्हेगारी विश्वात भीतीचे वादळ उसळले आहे. त्यांच्या ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेने गुन्हेगारांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. अक्षरश: गुन्हेगारी क्षेत्र तर व्हेंटिलेटरवर गेले आहे.
राज्यभरातही असाच कर्णिक पॅटर्न राबविला जावा, अशी मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये खून, दरोडे, गोळीबार, धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली होती. यंदा वर्षाच्या अवघ्या दहा महिन्यांमध्येच 46 हत्याकांड घडले आहेत. ही आकडेवारीच परिस्थिती किती गंभीर होती, हे स्पष्ट करणारे आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिस्थिती हातात घेतली. सातपूर आणि कॉलेज रोड येथील झालेल्या गोळीबाराच्या घटना म्हणजे या मोहिमेचे टर्निंग पॉईंट ठरले. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही, कोणतीही भीती न बाळगता कर्णिक यांनी कठोर कारवाई केली. या कारवाईत गुन्हेगारांना फक्त अटकच नव्हे, तर थेट क्राईम ब्रँच युनिट वनमध्ये नेऊन चहा-पाण्याच्या नावाखाली जबरदस्त धुलाई करण्यात आली तीही अशी की, त्याचा प्रभाव त्यांच्या समर्थकांवरही स्पष्ट दिसून आला.