

हिंदी चित्रपट ‘शोले’मधील अमर्याद प्रसिद्ध संवाद ‘बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जायेगा’ आपल्याला आठवतोय का? आज नाशिक शहरात या संवादाचा नवा अवतार ऐकू येतो, ‘भाई शांत रहो, नहीं तो कर्णिक आयेगा!’ कारण नाशिक शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडाकेबाज मोहिमेमुळे गुन्हेगारी विश्वात भीतीचे वादळ उसळले आहे. त्यांच्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेने गुन्हेगारांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. अक्षरश: गुन्हेगारी क्षेत्र तर व्हेंटिलेटरवर गेले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये खून, दरोडे, गोळीबार, धमकी यांसारख्या गुन्ह्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली होती. यंदा वर्षाच्या अवघ्या दहा महिन्यांत 46 खून-खराबे घडलेत. हे आकडेच परिस्थिती किती गंभीर होती, हे स्पष्ट करतात. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ, पोलिसांवरचा दबाव आणि सोशल मीडियावर ‘नाशिक गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ असे व्हायरल होणारे व्हिडीओ हे पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. लहान वयातील मुलेही पोलिसांना आव्हान देऊ लागली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिस्थिती हातात घेतली. सातपूर आणि कॉलेज रोड येथील झालेल्या गोळीबाराच्या घटना म्हणजे या मोहिमेचे टर्निंग पॉईंट ठरले. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही, कोणतीही भीती न बाळगता कर्णिक यांनी कठोर कारवाई केली. या कारवाईत गुन्हेगारांना फक्त अटकच नव्हे, तर थेट क्राईम ब्रँच युनिट वनमध्ये नेऊन जबरदस्त धुलाई करण्यात आली. तीही अशी की, त्याचा प्रभाव त्यांच्या समर्थकांवरही स्पष्ट दिसून आला.
या मोहिमेत पोलिसांच्या रडारवर आलेल्या काही प्रमुख नावांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे : भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे, जगदीश पाटील, रिपाइं माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्यांचे पुत्र दीपक व भूषण लोंढे, भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय, सागर आणि गौरव बागुल, मामा राजवाडे, अमोल पाटील, मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, ॲड. प्रशांत जाधव, दादाजी पाटील, इम्तियाज ऊर्फ चिपड्या, अंकुश पवार. हे सर्वजण केवळ राजकीय ताकदीमुळे बिनधास्त फिरत होते; मात्र यावेळी कायद्याचा बडगा कोणालाही न जुमानता उतरवण्यात आला.
हे पाहून गुन्हेगारांच्या समर्थकांमध्ये भीतीची लाट पसरली. जर आमच्या दादालाच एवढा चोप बसला, तर आम्ही तरी काय उरतो, या भीतीने नाशिक शहरात एक अनपेक्षित शांतता पसरली. रात्री नऊनंतर गल्ल्यांत फिरणारे टवाळखोर आणि अल्पवयीन गुंड अदृश्य झाले. पूर्वी भीती वाटावी अशी असणारी रस्त्यांवरील हवा, आता पुन्हा एकदा शांततेने भरलेली आहे.
कधी काळी धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवासाठी ओळखले जाणारे नाशिक, अलीकडे गुन्हेगारीमुळे बदनाम होऊ लागले होते. मात्र, संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या निर्णायक मोहिमेमुळे पुन्हा एकदा नाशिकने शांततेच्या वाटेवर वाटचाल सुरू केली आहे. पोलिसांच्या या अचूक कारवायांमुळे कायद्याचं राज्य म्हणजे काय असतं हे नाशिककरांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई व दहशत निर्माण करणारे अनेक पोलिस अधिकारी महाराष्ट्र पोलिसमध्ये होऊन गेलेले आहे. मात्र, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाया केल्या; मात्र कोणत्याही पक्षांमधील पदाधिकाऱ्याला व कार्यकर्त्याला त्यांनी माफ केले नाही. त्यांच्या कारवायांमध्ये सर्वात अधिक कारवाया या सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांवर झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.