Nepal flood File Photo
नाशिक

Nepal Flood| नेपाळमधील भीषण जलप्रलयातून नाशिकचे 11 पर्यटक सुखरूप बाहेर; कुटुंबीयांना मोठा दिलासा

Nepal Flood| गोरखपूरहून विमानाने मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे अडकलेल्या नाशिकच्या पेठ तालुक्यातील ११ पर्यटकांनी अखेर नेपाळची सीमा सुखरूपपणे ओलांडली असून, ते भारतात परतीच्या मार्गावर आहेत. हे सर्व पर्यटक शनिवारी (दि. २९) रात्री ८ पर्यंत गोरखपूर येथे पोहोचण्याची शक्यता असून, त्यानंतर विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पेठ नगर परिषद हद्दीतील अर्जुन शिंदे, रोहित शिंदे, विशाल शिंदे, रूपेश घोंगे, अभिषेक पवार, आकाश कोतूळकर, ओम शिंदे, पीयूष शिंदे, आयुष शिंदे, करण शिंदे आणि शुभम शिंदे हे ११ जण खासगी ट्रॅव्हल्सद्वारे गोरखपूरमार्गे नेपाळ पर्यटनासाठी गेले होते. नेपाळमध्ये जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास खोळंबला होता.

मनोकामना देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

'दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलो,' अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे. भारतात परतण्यासाठी या पर्यटकांना मदत मिळाली असून, परतीच्या प्रवासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचे या पर्यटकांनी सांगितले.

नेपाळ सीमा ओलांडल्यानंतर आता त्यांचा गोरखपूरमार्गे मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, पंचवटीतील सुमारे ४० पर्यटकही नेपाळमध्ये अडकल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, पेठच्या ११ पर्यटकांचा परतीचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT