नाशिक : विकास गामणे
कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात गतवर्षी कांदा लागवडीचा उच्चांक झाला होता. मात्र, यंदा कांदा लागवडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १ लाख ८० हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत २० हजार हेक्टरने घट झाली.
बागलाण तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. अतिवृष्टी तसेच कांद्याबाबत सतत बदलणारे धोरण यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जानेवारीच्या अखेरीस कांदा लागवडच झालेली नसल्याची नोंद झाली आहे.
द्राक्ष, उसाचा जिल्हा ही नाशिक जिल्ह्याची खरी ओळख. मात्र, जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून कांदा, मका व अन्य पिकांचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यातही गत १० ते १२ वर्षांत कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
दोन-तीन वर्षांपासून कांद्याचे भाव पडत असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढतच आहे. जिल्ह्यात साधारण खरीप, लेट खरीप व उन्हाळी कांद्याची लागवड होते. हे तिन्ही मिळून साधारणपणे ७५ हजार ते २ लाख हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असते.
मात्र, यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी ३ लाख ५७ हजार २५३ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. ही लागवड २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल १ लाख हेक्टरने वाढली होती. मात्र, यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र घटले आहे. प्रामुख्याने यंदा झालेल्या अतिवृष्टीने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले.
कांदा रोपाच्या टंचाईमुळे ५4 फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात १ लाख ८० हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षी ३१ जानेवारीपर्यंत नाशिक जिल्ह्यात १ लाख हजार ८७७ हेक्टर व लागवड झाली होती.
जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही कांदा लागवड सुरू आहे. त्यामुळे कांदा लागवडीचे क्षेत्र काही अंशी वाढू शकते, असा अंदाज आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचा कल हा काहीसा कमी झाला असल्याचे दिसून येत आहे.
'नाफेड'चा गोंधळही कारणीभूत
सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदी हमीभाव देऊन ही कांदा खरेदी केली जाणार असल्याचे सांगितले. परंतु, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. नाफेडनेही कांदा खरेदी पुरेपूर प्रमाणात केली नाही.
खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळाले नाही. शेतकऱ्यांना नाफेड कार्यालयावर सतत आंदोलने करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनावर झाला आहे.
खराब हवामानाचा रोपांना फटका
यावर्षी उन्हाळी कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट दिसत असून, कांदा लागवड खर्चात वाढ झाली आहे. सुरुवातीला अतिवृष्टी पावसामुळे रोपांची घट झाली होती. त्यानंतर टाकलेल्या रोपांवर सध्या कांदा लागवड सुरू आहे. मात्र, यावर्षी रोगट हवामानाने कांदा उत्पादन किती निघेल हे वातावरणावर अवलंबून राहणार आहे.
कांदा धोरणात शासनाकडून सातत्याने बदलते धोरण अंवलबले जाते. कांदा निर्यातीवर लावलेला कर असो की, कांदा निर्यातबंदीचा दूरगामी परिणाम हा कांदा भावावर होतो. कांद्याचे भाव वाढले की, सरकारकडून हस्तक्षेप केला जातो. शासनाने कांदा उत्पादकांच्या हिताचा विचार करत धोरण निश्चित करावे.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक संघटना
दरवर्षी १० एकर कांदा लागवड असते. पण यावर्षी ५ एकर कांदा लागवड केली आहे. लांबलेला पाऊस यातच झालेली अतिवृष्टी यामुळे कांद्याचे रोप खराब झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचा परिणाम कांदा उत्पादनात होत आहे.- रघुनाथ आहेर, कांदा उत्पादक, चांदवड