Nashik on 'yellow alert' for cold from today
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येणार असून, नाशिकला हवामान विभागाने रविवारपासून (दि. १६) तीन दिवसांचा 'यलो अलर्ट' दिला आहे. थंड वाऱ्यासह हाडे गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय थंडीची लाट जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांनाही व्यापणार असून, उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात सातत्याने घट नोंदविली जात आहे. शनिवारी (दि. १५) नाशिकचे किमान तापमान १०.३ तर निफाडचे ९.५ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.
अगोदर उत्तर राजस्थान व नंतर मध्य प्रदेशात थंडीने कहर केल्यानंतर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. काही दिवसांपूर्वीच धुळे हे राज्यातील सर्वाधिक थंड शहर म्हणून पुढे आले होते. त्या पाठोपाठ नाशिक शहराचा पारा घसरल्याची नोंद होती. दरम्यान, हवामान विभागाने नाशिकला रविवार, सोमवार
व मंगळवार असे तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा 'यलो अलर्ट' दिला आहे. थंड वाऱ्यासह हाडे गोठविणारी थंडी या काळात जाणवणार आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकचे किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सियस इतके आहे. तर कमाल तापमानातही सातत्याने घट होत आहे. शनिवारी कमाल तापमान २७.९ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. त्यामुळे दिवसभर झोंबणारी थंडी जाणवत असून, नागरिकांना उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे. याशिवाय जागोजागी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
नागरिकांना आवाहन नाशिकमध्ये पुढील काही दिवसात किमान तापमान ७ ते ८ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्यावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.