

नाशिक : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सुहास कांदे यांची जिल्हा प्रभारी तर त्यांच्या सोबतीला आमदार किशोर दराडे, उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे आणि माजी आमदार धनराज महाले यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील भगूर, सिन्नर, इगतपुरी, पिंपळगाव, चांदवड, मनमाड, नांदगाव, ओझर, सटाणा, येवला या ११ नगरपरिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून भाजपने जिल्ह्यात ताकद वाढवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे महायुती समन्वय करण्यासह ऐनवेळी मित्र पक्षांकडून दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना शिंदे गटाने जिल्हा प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यात नुकतीच जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आता निवडणूक प्रभारीचा जबाबदारी देखील आमदार कांदेवर सोपवण्यात आली आहे. कांदे यांच्यासोबतच आमदार किशोर दराडे, उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे आणि माजी आमदार धनराज महालेंनाही त्यांना सहायक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांसोबत चर्चा करण्यासोबतच उमेदवार निश्चितीचेही काम या प्रभारींना करावे लागणार आहे.