

इंदिरानगर (नाशिक) : ऑटो कन्सल्टंटसह इतर चौघांची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कमोदनगर येथील दीपक देवळे व ऐश्वर्या गायकवाड या बंटी-बबलीवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय पाटणी (५२, रा. गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांनी दीपक दत्तात्रय देवळे (रा. कमोदनगर) यांच्या फ्लॅट खरेदीबाबत ४९ लाख ९० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला होता. फ्लॅट घेण्यासाठी पाटणी यांनी पिरॅमल फायनान्स, टाटा कॅपिटल, आयआयएफएल फायनान्स, अर्थमेट फायनान्सकडून एकूण २५ लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यापैकी त्यांनी दीपक देवळेला ९ लाख ५८ हजार रुपये त्याच्या टीजेएसबी बँकेच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाइन ट्रान्स्फर केले. यासह ९ लाख ७४ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. देवळे याने पाटणी यांच्या एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डावरून ७ लाख ६८ हजार रुपये वापरले. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाटणी यांनी त्यांच्या मित्राच्या बँक खात्यातून पुन्हा देवळेला १ लाख २० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले. असे एकूण २८ लाख २० हजार रुपये ऑनलाइन व रोख स्वरूपात देवळेने स्वीकारलेले होते. पाटणी यांनी देवळेला फ्लॅट खरेदी करून देण्याबाबत सांगितले असता देवळे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे काही दिवसांनी दीपक देवळे याने हा फ्लॅट परस्पर दुसऱ्याला खरेदी करून देत पाटणी यांची फसवणूक केली. या बंटी-बबलीने एकूण ९२ लाख ६३ हजार ७४ रुपयांचा अपहार करत पाच जणांची फसवणूक केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सोनार तपास करत आहेत.
यांचीही आर्थिक फसवणूक
देवळे याची सहकारी ऐश्वर्या गायकवाड हिने रोहिणी खैरनार यांच्याकडून ७ लाख १० हजार रुपये, रेखा मोहिते यांच्याकडून ७ लाख ७० हजार रुपये, पद्मिनी वारे यांच्याकडून ४७ लाख १३ हजार ७४ रुपये व धरमवीरसिंग किर यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये असे एकूण ६४ लाख ४३ हजार ७४ रुपयांची फसवणूक करत अपहार केल्याचे समजले.