नाशिक

Nashik Leopard News : तिसऱ्या दिवशी बछड्यांपाठोपाठ मादी बिबट्या पिंजऱ्यात

गणेश सोनवणे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, तालुक्यातील नायगाव खोऱ्यात वनविभागाने बिबट्यांना रेस्क्यू करण्याचे ऑपरेशन सुरूच ठेवले असून बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बछड्यांपाठोपाठ मादी बिबट्याही पिंजऱ्यात अडकली. तिच्या डारकाळ्यांनी नायगाव खोरे परिसर दणाणून गेला. (Nashik Leopard News)

एक ते दीड वर्ष वयाचे दोन बछडे रेस्क्यू झाल्यानंतर वनविभागापुढे मादी बिबट्याला रेस्क्यू करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. बछडे पिंजऱ्यात अडकल्यानंतर पुन्हा दोन पिंजरे लावत वनविभागाने मोहीम तीव्र केली. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गुरुवारी सकाळी बिबट्याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारच्या रात्री मादी व एक बछडा कॅमेरामध्ये आले होते. त्यानुसार वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन कायम ठेवले. (Nashik Leopard News)

गर्दी हटवताना मादीने मारला पंजा, वनरक्षक जखमी

मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी तसेच फोटो सेशन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यातूनच हुल्लडबाजी झाल्याचे वनविभागाने सांगितले. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने मोहिमेत अडथळा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान पिंजरा ताब्यात घेत असताना नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती आणि ही गर्दी हटवत असतानाच सकाळी सहाच्या सुमारास मादी बिबट्याने पिंजऱ्यातून वनरक्षक संजय गीते यांच्या पायावर पंजा मारला. त्यात पायाला खोलवर जखम झाली. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी करू नये अशी विनंती वन विभागाने केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT