नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | पेस्ट कंट्रोलला विरोधाचा धूर; मनपामार्फत फवारणीचा सूर

Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा : पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या कामगिरीवर नगरसेवकांचा संशय; महासभेत जोरदार टीका, केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेस्ट कंट्रोल केवळ कागदावरच सुरू असल्याचा आरोप करीत ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी संशय व्यक्त केल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून डास निर्मूलनाचे काम हाती घेण्याविषयी चाचपणी करण्याचे आदेश महापौर हिंगौरी आहेर - आडके यांनी प्रशासनाला दिले.

शुक्रवारी (दि. १७) झालेल्या महासभेत सदस्यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेत, शहरात धूरफवारणी करणारी वाहने प्रत्यक्षात फारशी दिसत नसल्याची तक्रार केली.

काही ठिकाणी फवारणी झाली, तरी डासांचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते घरात शिरत असल्यामुळे नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे धूरफवारणीच्या परिणामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सदस्यांनी जोरदार टीका केली.

ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत ऐनवेळी मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवून, दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक आरोग्यासारख्या संवेदनशील विषयात अशा प्रकारचा ढिसाळ कारभार स्वीकारार्ह नसल्याचे मत सदस्यांनी नोंदविले.

यावेळेला धूरफवारणीच्या प्रत्यक्ष कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. दररोज किती कर्मचारी आणि वाहने कार्यरत असतात, कोणत्या भागात किती फवारणी केली जाते, याची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करावी तसेच पुढील निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने राबवावी, अशी सूचना सदस्यांनी केली.

प्रशासनाला अहवालाचे निर्देश

चर्चेअंती महापौर आहेर - आडके यांनी तात्पुरता तोडगा म्हणून संबंधित ठेक्याला केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ मंजूर केली. तसेच भविष्यात धूरफवारणीचे काम महापालिकेने स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आर्थिक तरतुदीचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT