नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक मनपाच्या आर्थिक श्वेतपत्रिकेत आकड्यांची विसंगती असल्याची कबुली प्रशासनानेच दिल्याचा दावा करत शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
जून २०२६ मध्ये महासभेत व अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या श्वेतपत्रिकेत मार्चअखेरची अंतिम आकडेवारी न देता जुने व अंदाजित आकडे सादर करत सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.
तिदमे यांनी लेखा विभागाच्या खुलाशाचा हवाला देत फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात १४३ कोटी रुपयांची शिल्लक गृहीत धरली असताना प्रत्यक्षात ती ६८१ कोटी रुपये निघाल्याने ५३८ कोटी रुपयांच्या तफावतीची कबुली प्रशासनानेच दिल्याचा दावा केला.
नगररचना विभागाचे १७३.४९ कोटी रुपये तीन वर्षे स्वतंत्र खात्यात राहिल्याची बाबही गंभीर वित्तीय त्रुटी असल्याचे त्यांनी म्हटले. महसुली उत्पन्नात एका वर्षात ३७ टक्के वाढ दाखवण्यामागील कारणांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणतीही करवाढ न करता ८६३ कोटी रुपयांची वाढ कशी शक्य झाली, असा प्रश्न त्यांनी केला.
याशिवाय ४०० कोटी रुपयांच्या बॉन्ड कर्जाचा भार, वीज-पाणी खर्चातील वाढ आणि महसुली नफ्यावरील हरकतींवर प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत श्वेतपत्रिकेत चुकीची माहिती सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तिदमे यांनी केली आहे. आगामी महासभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा इशाराही दिला.