लासलगावः पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात सोमवारी टाकळी (विंचूर) येथील काळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले, तर खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत कांदा साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने बिबट्याला जिवंत पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. हा बिबट्या आजारी असल्याने त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर रविवारी सकाळी सुमारे ७ च्या सुमारास रामेश्वर शिंदे यांच्या घराजवळ दोन बिबटे आले. शिंदे यांनी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क करताच त्यांनी आरडाओरडा करत दोन्ही बिबट्यांना हुसकावून लावण्यात आले. मात्र काही वेळाने एक बिबट्या पुन्हा घराजवळ येऊन बसला. यावेळी शेतकऱ्यांनी धाडस दाखवत कांदा साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने त्याला बंदिस्त केले.
त्याच्यावर हिरवे शेडनेट टाकून वन विभागाला सतर्क देताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नाशिक येथील ट्रॅक्विलायझर टीटीसी) पथकाने बिबट्याला बेशुद्ध केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे तातडीने हलविण्यात आले. दरम्यान, खडक माळेगावातून निसटलेला दुसरा बिबट्या टाकळी (विंचूर) येथील काळे वस्ती परिसरात पोहोचला. द्राक्षबागेत दबा धरून बसलेल्या या बिबट्याने प्रकाश बबन काळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
शोधमोहीम सुरू असताना बिबट्याने वन विभागाचे मदतनीस कर्मचारी सादिक भय्या शेख यांच्यावरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर यानंतर हा बिबट्या संतोष काळे यांच्या वस्तीच्या दिशेने पळाला. त्या वेळी दीड वर्षांची ओवी ही घराबाहेरील शेडमध्ये झोळीत झोपलेली. होती. तिची आजी सिंधुबाई पाणी पिण्यासाठी घरात गेल्या असताना बिबट्या झोळीच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. नेमक्या याचवेळी सिंधुबाई बाहेर आल्या असता त्यांनी बिबट्याला पाहताच जोरदार आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला आणि घराशेजारील गिनी गवतात जाऊन लपला.
वन विभागाने सुमारे सहा तास ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दाट गवतामुळे बिबट्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. फटाके फोडूनही तो बाहेर आला नाही. अखेर वन विभागाने बंदिस्त पिकअप वाहन गवतामध्ये घातले असता बिबट्याने अचानक बाहेर येत तेथून दुसऱ्या शेतात गायब झाला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजरा लावला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.