Sindhudurg Leopard Attack : बिबट्याने नवजात वासरावर हल्ला चढवत ओढून नेले

न्हावेली टेंबवाडी परिसरात बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Attack
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली गाय.
Published on
Updated on

मळगांव : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, न्हावेली टेंबवाडी येथील शेतकरी बाळू नाईक यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने नुकत्याच व्यायलेल्या गायीच्या वासरावर हल्ला चढवत ते ओढून नेले. त्यावेळी गाईवर हल्ला केला त्यात ती जखमी झाली आहे.

न्हावेली टेंबवाडी येथील शेतकरी बाळू नाईक यांच्या जनावराच्या गोठ्यात बिबट्याने रात्रीच्या अंधारात शिरून हल्ला केला. गोठ्यातील जनावरे घाबरून ओरडू लागली. आवाज ऐकून घरातील सदस्य बाहेर धावले असता जखमी गाय आणि बेपत्ता झालेले वासरू पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने या हल्ल्याची खात्री झाली.

गेल्या काही दिवसांपासून न्हावेली, टेंबवाडी तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अनेकांनी रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले होते. मात्र वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता थेट गोठ्यात घुसून हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेषतः लहान मुले, शेतकरी व रात्रीच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक भयभीत झाले आहेत. संध्याकाळ होताच गावात शुकशुकाट पसरत असून, अनेकांनी रात्री बाहेर पडणेच टाळले आहे. ग्रामीण भागातील जनावरे आता बिबट्याच्या दहशतीखाली आली असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या नितेशा नाईक यांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी जोरदार मागणी केली आहे.

‘वनविभागाने एखादी जीवितहानी झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच कठोर पावले उचलावीत,’ असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांकडून वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news