नाशिक

Nashik News : गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचे फेरनियोजन करावे. गंगापूर एेवजी दारणा धरणातून अतिरीक्त ०.५ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्याकरीता नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश देताना कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ औरंगाबाद यांनी गंगापूर धरण येथील सद्यस्थितीचा विचार केला नसल्याची तक्रार फरांदे यांनी केली आहे. गंगापूर धरणातील ७० टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाणी हे द्राक्षबागांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देण्यात येते. गंगापूर धरणातून पाणी मराठवाड्यासाठी सोडल्यास शेतकऱ्यांना तिसरे आवर्तन देणे शक्य होणार नाही त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होईल. गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. याबाबत सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्याबाबत देण्यात आलेली आकडेवारी वास्तविकतेला धरून नसल्याचे आ. फरांदे यांचे म्हणणे आहे. गंगापूर धरणात जायकवाडी प्रमाणे मृतसाठा धरलेला नसल्यामुळे तळातील पाणी उचलताच येत नाही. त्यामुळे या मृतसाठ्याचा विचार करता धरणातील उपलब्ध साठा कमी आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर होणाऱ्या वहन हानीमुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता कमी आहे. परंतू यामुळे नाशिकचे मोठे नुकसान होईल, असा दावा आ. फरांदे यांनी केला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT