Mission Green Monsoon Nashik 
नाशिक

Mission Green Monsoon Nashik : मिशन ग्रीन मान्सून'चा पाचवा टप्पा प्रत्येक प्रभागात

Nashik news: रोपांच्या मागणीसाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कुंभमेळा तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत सुरू असलेल्या 'मिशन ग्रीन मान्सून' उपक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पाचव्या टप्प्यात आता क्यूआर कोडद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांनी मागणी केलेल्या देशी प्रजातीच्या रोपांचे प्रभागनिहाय वाटप करण्यात येणार आहे.

नाशिक शहर अधिक हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने नागरिकांना त्यांच्या परिसरात वृक्षारोपण करता यावे, यासाठी विशेष क्यूआर कोड नोंदणी प्रणाली उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत, ८,७५० देशी वृक्षांच्या रोपांची मागणी नोंदविली आहे. या सर्व नोंदणीकृत नागरिकांना येत्या पाचव्या टप्प्यात त्यांच्या प्रभागातून रोपांचे वितरण केले जाणार आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, संबंधित नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संवर्धनावरी विशेष भर देणार आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी गिरीश महाजन स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून वृक्षरोपणात सहभाग घेत आहेत. ते वृक्षप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असून, वृक्षलागवड ही केवळ शासकीय मोहीम न राहता, लोकचवळ बनावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

'मिशन ग्रीन मान्सून'चे यश

'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या पहिल्या चार टप्प्यांत २५ हजारोराहून अधिक देशी वृक्षांच्या लागवडीला प्रारंभ झाला. या अभियानाचा प्रारंभ पहिल्या टप्प्यात सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ५ हजार रोपांच्या लागवडीने झाला. दुसऱ्या टप्प्यात म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) आणि त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात सहा हजार रोपांची लागवड केली. तिसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर सहा हजार देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करीत नदीला हरित संरक्षण कवच देण्यास सुरवात झाली. चौथ्या टप्प्यात दऱ्याई माता परिसर, दरी येथे पाच हजार आणि पुणे विद्यापीठ उपकेंद्र परिसरात दोन हजार वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ करण्यात आला.

हरित नाशिक हा केवळ शासनाचा संकल्प नाही, तर प्रत्येक नाशिककराचा संकल्प आहे. वृक्षलागवडीबरोबर त्यांचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला देशातील सर्वात हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा आपला निर्धार आहे.
गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT