

देवळा : गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या देवळा तालुक्यातील खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.१८ जुलै) रोजी सायंकाळी महावितरणच्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रावर धडक दिली. महावितरण आणि सरकारच्या निष्काळजी धोरणांचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या या 'अंधार जनआक्रोश' मोर्च्यामुळे खळबळ उडाली.
अंधारामुळे जनजीवन विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून 'इमर्जन्सी लोडशेडिंग'च्या नावाखाली सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या कुटुंबांचे जीवन अंधारमय झाले आहे. विशेषतः, परिसरात बिबट्या व वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वीज जाणे हा नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. यामुळे महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा मोठा परिणाम होत असल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हातात कंदील-मशाल घेऊन निषेध
या समस्येचा जाब विचारण्यासाठी शनिवारी सायंकाळी ७:३० वाजता शेतकरी हातात कंदील, मेणबत्त्या आणि मशाली घेऊन, तर विद्यार्थी आपले शैक्षणिक साहित्य घेऊन उपकेंद्रावर जमा झाले. यावेळी आंदोलकांनी "आम्हाला अंधार नको, हक्काची वीज हवी," अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके व पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील शेवाळे आणि शेतकरी शरद बोरसे यांनी आपल्या मनोगतातून प्रशासनावर टीका केली. शेतशिवारातील लोडशेडिंग त्वरित बंद करून नियमित वीजपुरवठा न केल्यास, महावितरण कार्यालय आणि उपकेंद्रांना कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात खामखेडा, सावकी, भऊर व विठेवाडी येथील शेतकरी व नागरिकांचा मोठा सहभाग होता.