नाशिक

Nashik News I गोदाघाटाचे सौंदर्य, पावित्र्य जपणे नाशिककरांचे कर्तव्य – पालकमंत्री दादा भुसे

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक प्रकल्प उभे राहतात. मात्र, हे प्रकल्प टिकले पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी प्रकल्प उभारणाऱ्या यंत्रणेबरोबरच स्थानिक नागरिकांचीदेखील आहे. गोदाघाट नाशिकचे वैभव आहे. गोदापार्क सारखे प्रकल्प गोदाघाटाच्या सौंदर्यीकरणात भर घालत आहेत. गोदाघाटाचे सौंदर्य व पावित्र्य जपणे प्रत्येक नाशिककराचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांच्या संकल्पनेतून नाशिक महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुलालगत रविवारपेठेतील गंगावाडी परिसरात उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उद्यान तसेच रामवाडीतील गोदापार्क प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे, सचिन भोसले, रश्मी भोसले, मामा ठाकरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, गोदाघाटाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानामुळे होणार आहेत. नाशिक शहरात २०१६ पासून स्मार्ट सिटीअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाली आहेत. जवळपास एक हजार कोटींचे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामुळे नाशिक शहराचा कायापालट होणार आहे. गोदापार्क व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानाची कामे पूर्ण झाली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदापार्कचे काम सुरू असताना नागरिकांनी असे प्रकल्प जपले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

असा आहे गोदापार्क

गोदापार्कमध्ये ओपन एअर रेस्टॉरंट, बोर्ड एक्स मिरर बबलर झेड वॉटर टॅक्सिड, विविध देशी झाडे लावण्यात आली आहेत. गोदापार्कपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानापर्यंत नौकाविहार करण्यासाठी जेट्टी उभारणी करण्यात आली आहे. गोदा वॉकमध्ये नागरिकांसाठी बसण्यासाठी बेसॉल्ट दगडाचे बेंचेस व 360 मीटरचा नदीकिनारी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. गंगावाडी येथे बेसॉल्ट दगड बसण्यात आले आहे. सदर कामांची अंदाजे किंमत पंधरा कोटी रुपये आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT