नाशिक

Nashik News : द्राक्ष उत्पादकाला सात लाखांचा गंडा, परभणीतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा

गणेश सोनवणे

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- अस्मानी-सुलतानी संकटाने पिचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांनीही घेरल्याचे दिसत आहे. अवकाळीचा फटका आणि आयात-निर्यात शुल्कामुळे उत्पादनखर्चही वसूल हाेणे मुश्किल झालेले असताना व्यापारीही द्राक्ष खरेदीचे पैसे अदा न करता पलायन करत आहेत. वडनेरभैरव येथील बागायतदारांची परभणी जिल्ह्यातील नर्सपूर (शेलू, बोर्किनी) व्यापाऱ्याने तब्बल सहा लाख ८४ हजार ५१२ रुपयांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलिसांनी व्यापाऱ्यावर ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे.

वडनेरभैरव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सर्वाधिक द्राक्ष पिकांचे उत्पादन घेतले जाते. यामुळे वडनेरभैरव पंचक्रोशीला 'द्राक्षपंढरी' म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी दरवर्षी देशातून व परदेशातून द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. हे व्यापारी सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी रोखीत द्राक्ष खरेदी करतात. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा त्यावर विश्वास बसतो. याचा फायदा घेत काही व्यापारी एक-दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांना थोडे पैसे देतात अन‌् माल घेऊन जातात. मात्र, नंतर संपर्कच टाळतात. मोबाइलवरदेखील प्रतिसाद मिळणे बंद झाल्यावर शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशीच घटना वडनेरभैरव येथे नुकतीच घडली. भारत गोविंद साळुंखे (४८) यांनी परभणीच्या नर्सपूर येथील महादेव बाबासाहेब गडदे या व्यापाऱ्याला द्राक्षबागेचा सौदा केला हाेता. त्याने ३२ प्रतिकिलो दराने सात लाख ८४ लाख ५१२ रुपये किमतीचे २४५.१६ क्विंटल द्राक्ष खरेदी केले होते. त्या मोबदल्यात शेतकऱ्याला गडदे यांनी आरटीजीएसद्वारे एक लाख रुपये दिले. उर्वरित पैसे नंतर देण्याचे ठरले होते. आज, उद्या म्हणत पैसे देणे टाळले. यामुळे साळुंखे यांनी या व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीची फिर्याद नोंदवली. 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT