नाशिक

Nashik News I गायकवाड सभागृहाची युद्धपातळीवर रंगरंगोटी

अंजली राऊत

नाशिक  (व्दारका) : पुढारी वृत्तसेवा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात येत्या २७ जानेवारीला होणाऱ्या सहकारी बँकांच्या राज्य सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येणार असल्याने संपूर्ण सभागृहाचे रूपडे पालटण्याचे काम युद्धपातळीवर महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागातर्फे सुरू आहे. केवळ सभागृहच नव्हे तर लगतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

मागील वर्षभरात देखभालीअभावी संपूर्ण दुर्लक्ष झालेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे या निमित्ताने रूप खुलले आहे. तब्बल 2000 आसनक्षमता असलेल्या गायकवाड सभागृहाच्या संपूर्ण व्यासपीठाचे फ्लोअरिंग बदलण्यात आले असून, नवीन पडदे बसविण्यात आले आहेत. स्टेजवरील तसेच सभागृहाची लायटिंग व्यवस्था दुरुस्त करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त तुटलेल्या खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत. सर्व पंखे दुरुस्त करण्यात आलेले आहेत. नाशिक पूर्व विभागातर्फे संपूर्ण सभागृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. येथील स्वच्छतागृहातील वॉश बेसिन व भांडी नवीन टाकण्यात येत आहेत. संपूर्ण स्वच्छतागृहाला रंगरंगोटी करण्यात आली असून, तेथे स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच पार्किंग परिसर कचरामुक्त करण्यात येत आहे. येथील पार्किंगमध्ये भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबई नाक्यापासून दादासाहेब गायकवाड सभागृहापर्यंतचा नंदिनी नदीशेजारील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन परिसरात आल्याने तपोवन परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात आला होता. त्याच पद्धतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड परिसरात स्वच्छता व रंगरंगोटीची मोहीम सुरू आहे. त्यामुळे असे व्हीआयपी नेहमी यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. हे सभागृह वातानुकूलित करावे. तसेच संपूर्ण नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT