नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खरीप हंगामातील पिकांसाठी २५ टक्के भरपाईची रक्कम आॅगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असताना अद्यापही त्याचे पूर्ण वाटप झालेले नाही. कापूस पिकाच्या समावेशाचे आदेश असतानाही विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल. फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करू, असा सज्जड दम पालकमंत्री दादा भुसे पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि.२२) मंत्री भुसे यांनी पीकविमा याेजनेसंदर्भात आढावा घेतला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ओरिएंटल पीकविमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित आदी उपस्थित होतेे.
चालू वर्षी जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४८ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला. परंतु, पावसाअभावी ५५ महसुली मंडळांमध्ये खरीप हंगाम वाया गेला असून, रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सोयाबीन, मका, बाजरी व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पीकविम्याचे पहिल्या २५ टक्क्यांपैकी १०५ कोटी रुपये शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहे. आतापर्यंत पीकविमा कंपन्यांनी केवळ ५७ कोटी ४६ लाख रुपये वितरित केल्याची बाब बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांनी पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश देऊनही पीकविमा कंपन्यांकडून हा मुद्दा गांभीर्याने घेतला जात नसल्याबद्दल भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने निधी उपलब्ध करून दिला असताना तुम्ही तो वाटप का केला नाही. तुम्ही तुमचा नफा बघता का? शेतकऱ्यांना पैसे देतात याचा अर्थ तुम्ही दानधर्म करून त्यांच्यावर उपकार करत नाही, अशा शब्दांत भुसे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे. अन्यथा नव्या वर्षात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या कार्यालयात रिटर्न गिफ्ट देऊ, असा इशारा भुसे यांनी दिला.
बांधावर गेला का कधी?
पीकविमा कंपन्यांकडून मदतीच्या वाटपाबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे पाहून मंत्री दादा भुसे यांचा पारा अधिक चढला. शेतकऱ्यांची आज स्थिती वाईट आहे. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेला का? असा प्रश्न भुसे यांनी विचारला. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हसत नाही, असे उत्तर दिल्यामुळे भुसे यांचा अधिक संताप झाले. शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका, अशा शब्दांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
बँकांनी उपक्रम हाती घ्या
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजही १९,५२० जण लाभापासून वंचित असल्याचे बैठकीत समोर आले. त्यावर मंत्री भुसे यांनी जिल्हा बँकेसह सर्वच बॅंकांनी पुन्हा एकदा याबाबत उपक्रम हाती घेत जनजागृती करावी. जे कोणी पात्र शेतकरी योजनेपासून वंचित असतील, त्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना केल्या.
हेही वाचा :