पुणे विमानतळाची मोठी भरारी; विमानोड्डाणांमध्ये वाढ | पुढारी

पुणे विमानतळाची मोठी भरारी; विमानोड्डाणांमध्ये वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरून होणारी विमानोड्डाणे आणि प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षापेक्षा यंदा अधिक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर 2023 या महिन्यातच 5 हजार 481 विमान फेर्‍या झाल्या असून, त्याद्वारे महिनाभराच्या कालावधीत 7 लाख 80 हजार 618 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्रशासनाने केली आहे. पुणे शहरातील नागरिकांच्या दैनंदिन कामाचा व्याप वाढत असून व्यापार, कार्यालयीन कामे, पर्यटन यांसारख्या विविध कारणांनी पुणेकर पुणे विमानतळावरून विमानाने प्रवास करण्यावर भर देत आहेत.

त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी, विमान फेर्‍याही वाढत आहेत. याच संदर्भातील आकडेवारी विमानतळ प्रशासनाने शुक्रवारी (दि. 22) प्रसिद्ध केली. त्याद्वारे पुण्यातून होणार्‍या विमान फेर्‍यांमध्ये आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

अशी झाली विमानतळावरील वाढ

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 5 हजार 69 विमानांची उड्डाणे (फेर्‍या) झाली होती. त्याद्वारे गेल्या वर्षी 6 लाख 64 हजार 339 प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा मात्र त्यात वाढ झाली असून, ऑक्टोबर 2023 मध्ये 5 हजार 481 विमानांची उड्डाणे (फेर्‍या) झाली आहेत. त्याद्वारे 7 लाख 80 हजार 618 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

नवीन टर्मिनलची गरज

पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्या विमानतळ टर्मिनलच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वर्षभरात ये-जा होत आहे. त्यामुळे जुने विमानतळ टर्मिनल हे अपुरे पडत आहे.

दिवसाला 180 विमानांची उड्डाणे

पुणे विमानतळावरून दररोज सरासरी 90 विमाने जातात आणि तितकीच विमाने पुण्यात येतात. अशी एकूण 180 विमानांची नोंद पुणे विमानतळावर होत असते.

हेही वाचा

Back to top button