दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा! | पुढारी

दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : निवडणूक प्रचारात शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तींसाठी (दिव्यांगांसाठी) निवडणूक प्रचारातून लुळा, वेडा, आंधळा, मुका, एकाक्ष, फुटका, बहिरा, लंगडा, असे शब्द वापरू नयेत, अशा मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत.

असले शब्द वापरणे हा दिव्यांगांचा अपमान आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यात वरीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रचारादरम्यान होणार्‍या नेत्यांच्या भाषणांसह समाजमाध्यमांतील पोस्ट, जाहिराती तसेच प्रचारपत्रिकांतील मजकुरातूनही तारतम्य पाळावे लागणार आहे.

…तर 5 वर्षे कारावास

दिव्यांगांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम
2016 च्या कलम 92 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

‘या’ सूचनाही बंधनकारक

सर्व राजकीय पक्षांना आपापल्या संकेतस्थळांवरून आम्ही दिव्यांगांना अन्य लोकांप्रमाणे आदराने वागवतो, असे जाहीर करावे लागेल.
कार्यकर्त्यांकरवी दिव्यांगांशी संपर्क साधायचा, तर संबंधित कार्यकर्त्यांना आधी या मार्गदर्शक सूचनांबाबत अवगत करावे.
राजकीय पक्षांनी दिव्यांगांच्या तक्रारींसाठी पक्षांतर्गत विभाग स्थापन करावा.
दिव्यांगांना राजकीय पक्षांनी सदस्यत्व द्यावे. निवडणुकीतील त्यांचा सहभाग वाढेल, असे पाहावे.

Back to top button