नाशिक

Nashik News : पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे कला झळकणार दिल्लीच्या राजपथावर

गणेश सोनवणे

सुरगाणा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा – सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, रक्षा मंत्रालय भारत सरकार, संगीत कला नाटक अकादमी दिल्ली तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे भारत निमित्ताने ७५ वा प्रजासत्ताक दिन समारोह सांस्कृतिक कार्यक्रमात नवी दिल्ली येथील राजपथावर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे बनविणारे कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांची सोंगी मुखवटे लोकनृत्य कला सादर केली जाणार आहे.

या कला पथकाचे कला प्रमुख पेठ तालुक्यातील धाब्याचापाडा येथील छबिलदास गवळी तसेच बोहाडा नृत्य निर्देशक गुजरात आहवा डांग जिल्ह्यातील धवळीदौड येथील पवनभाई बागुल हे भूषविणार आहेत. या सांस्कृतिक कला पथकात शिवराम चौधरी यांनी तयार केलेली कार्निव्हल कलेतील रामायण, महाभारतातील प्रमुख भूमिका साकारलेले पन्नास मुखवटे परिधान करून लोकनृत्य कला राजपथावर सादर केली जाणार आहे. हे वर्ष 'नारी शक्ती वंदन' असल्याने हे जड असलेले सोंगे, मुखवटे परिधान करून तीस ते अठरा वयोगटातील अठ्ठेचाळीस आदिवासी तरुणींचा चमू हि बोहाडा नृत्य कला सादर करणार आहेत. हि मुखवटे नृत्य कला सादर करण्यासाठी गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून नवी दिल्ली येथे सराव केला आहे. विशेषतः हि कला आदिवासी समाजात पुरुष सादर करतात मात्र नारी शक्ती वंदन वर्षा निमित्ताने तरुणी हि कला नवी दिल्लीच्या राजपथावर सादर करुन' हम भी कुछ कम नही' हे दाखवून देतील.

कोणती सोंगे / मुखवटे तयार केलेली असता ?

यामध्ये भोवाडा उत्सवातील सोंगे/ मुखवटे या उत्सवात विशेषतः रामायण, महाभारत काळातील तसेच जंगलातील पशू ,पक्ष्यांची, दैत्य, असूर, दैनंदिन जीवनातील पात्रे, निसर्ग देवता आदी प्रतिमेचे मुखवटे तयार केलेले असतात. यामध्ये श्रीकृष्ण, बळीराम (बलराम), कार्तिक स्वामी, नवनाथ, विराट, दत्तात्रेय, पंचमुखी, मारुती, विश्व स्वरूप. टोप वीरभद्र मुखवटे/सोंगे- भक्त पुंडलिक, वराह( डुक्कर), गणपती, ऐडका, चाच्यासूर, सुर्पनखा, खाप-याचोर, ससा, शंकर भगवान, पार्वती, तारकासूर, नळ निल, तिळसंक्रात, पोपट, एकादशी, व्दादशी, काळभैरव ( काळ बहिरम), संद्रयासूर, वाल्मिकी, नारदमुनी, चंद्र, सूर्य, भीम, अर्जुन, ज्योतिर्लिंग, अश्व( घोडा), गरुड, श्रावणबाळ कावडधारी,त्राटिका, आसाळी, सोंड्या दैत्य,बुद्ध बृहस्पति, कच्छ(कासव),मत्स्य (मासा), मयुर (मोर), नंदी(बैल), झुंबाड, मारुती, नडग( अस्वल), वाल्या कोळी (वाल्मिकी),नाग, नागिन, इतर कलेची पात्र, सरस्वती, महिषासुर, शंखासुर, रावण, राम, लक्ष्मण, सिता, त्रिपुरासूर(शंकर), मारुती ( जंबुमाळी), त्राटिका ( राम, लक्ष्मण), भिक्षादित्या( विटाळ), विक्रमादित्य वेताळ राजा, खंडेराव, गजासूर शंकर, इंद्रजित रावणाचा पुत्र, खाप-या, नृसिंह, आगे वेताळ ( अग्नी देवता), शेंद-या सूर, एकादशी, मृतमाय, मृत मान्य, बाळंतीण, भीम अरासंघ, रक्तादेवी, रक्त बीजे, अंबामाता, भस्मासुर, मोहिनी, वीरभद्र दक्ष राजा, हिरण्यकशिपू, कयाटू, टुगू, चारण हे मनोरंजनाचे लोक कलेवर आधारित सोंग आहे.

भोवाडा उत्सवासाठी लागणारे कागदी मुखवटे बनविणारे कलाकार हे दुर्मिळ झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे साठ ते सत्तर वर्षापुर्वी पुंजा महाले पाटील हे कागदी लगद्यापासून मुखवटे तयार करीत असत. तदनंतर त्यांचा मुलगा भास्कर महाले यांनी हि कला हस्तगत केली होती. तेथेच तुकाराम तेली हा कलाकार मुखवटे साकारत असे त्यांचे निधन झाल्याने हि कला लोप पावली त्यांच्या कडून मुखवटे तयार करण्याचे कौशल्य शिकलेले पिंपळसोंड ता. सुरगाणा येथील शिवराम चौधरी हे हुबेहूब मुखवटे तयार करीत आहेत.

यापूर्वी विविध ठिकाणी सादरीकरण…

"शिवराम चौधरी या कलाकारने बनविलेले मुखवटे हे २६ जानेवारी २०२३ च्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील लाल किल्लावरील राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकाविला जातो त्याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम मंचावर सादर करण्यात आले आहे. आहवा डांग जिल्ह्यातील दवळीदोड येथील कलाकार यांनी भारतीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात या मुखवटयांचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच बीग बि फिल्म स्टार अमिताभ बच्चन यांनी गुजरात सरकार सांस्कृतिक कार्य मंत्रालय गांधीनगर यांच्या तर्फे गुजरात टुरिझम सापुतारा फेस्टिवल मध्ये हे मुखवटे परिधान करून गुजरात टुरिझमची जाहिरात दुरदर्शन वर झळकली आहे. दरवर्षी सापुतारा फेस्टिवल मध्ये भोवाडा उत्सव कलापथक सहभागी होत आहे. शिवराम चौधरी यांनी कणसरा चौक नाशिक, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा म्युझियम, राजस्थान, ओरिसा, आदिवासी संशोधन परिषद पुणे, इंदौर मध्ये प्रदेश, जागतिक आदिवासी गौरव दिन, जिल्हा परिषद आयोजित कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात भोवाडा कला पथकाने कला सादर करुन दाद मिळवली आहे.

या लोककलेचा जतन व संवर्धन होणे हि काळाची गरज बनली आहे. या करीता कलेची गोडी असणाऱ्या रसिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. "- भोवाडा उत्सव कलाकार शिवराम चौधरी रा.पिंपळसोंड

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT