नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने बुधवारी (दि. १७) भुजबळ फार्म येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस प्रारंभ केला असून, पहिल्या दिवशी २११ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पक्षाने जागांची मागणी केली असून, महायुतीची वाट पाहात आहोत.
सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुतीतून लढणार अन्यथा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सांगितले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भुजबळ फार्म येथील कार्यालयात घेतल्या.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील उपस्थित होते. मुलाखती झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, आज आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या.
निवडणुकीसाठी पक्ष पूर्णपणे सज्ज असून, शहरात पक्षाबद्दल असलेला विश्वास, पक्षाची ताकद तसेच कार्यकर्त्यांमधील उत्साह स्पष्टपणे दिसून येतो आहे. लवकरच वरिष्ठ नेत्यांशी तसेच ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निर्णय घेऊन पक्षाच्या धोरणानुसार योग्य, सक्षम, लोकप्रिय व जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल.
इच्छुकांची मुलाखती झाल्याचा सर्व अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर सर्वानुमते दांडगा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी देण्यात येईल, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
भुजबळ फार्म येथे सकाळी १० पासून सुरू झालेल्या मुलाखती सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात आल्या. यावेळी कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.