

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना (शिंदे गट) महायुती निश्चित मानली जात असली तरी जागावाटपाचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपने स्वतःला मोठा भाऊ मानत ८५ ते ९० जागांवर हक्क केला असताना शिंदे गटाला देखील ६० जागा हव्या आहेत. शिंदे गटातर्फे गुरुवार (दि.१८) पासून इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ होत असून, या निमित्ताने महायुतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी युती, आघाड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचे सूतोवाच केल्यानंतर महायुतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
इच्छुकांची विक्रमी संख्या लक्षात घेता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली जात असली तरी वरिष्ठ नेत्यांनी मात्र महायुतीद्वारेच निवडणूक लढविण्याचे सूचित केले असल्याने स्थानिक पातळीवर देखील आता महायुतीच्या चर्चेची तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने भाजपने शिंदे गटाला ३२ जागांची ऑफर दिल्याचे सांगितले जाते. परंतु शिंदे गटाने ६० जागांवर दावा केला आहे. गत निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. त्यामुळे महायुतीत सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी शिंदे सेनेची मागणी आहे. किमान ५० जागांवर एकमत होण्याची शक्यता शिंदे सेनेच्या एका नेत्याने वर्तविली आहे.
दरम्यान, शिंदेसेनेतर्फे इच्छुकांच्या गुरुवारपासून मुलाखतींना प्रारंभ होत आहे. शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, आ. किशोर दराडे, संपर्कप्रमुख विलास शिंदे, जयंत साठे, चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या निमित्ताने शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये महायुतीबाबतही चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.