

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे. भाजपने गेल्या तीन दिवसांत पाचशे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, अद्यापही निम्म्याहून अधिक प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया शिल्लक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेदेखील बुधवारी (दि.१७) सुमारे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मनसेतर्फे मंगळवार (दि.१६) पासून इच्छुकांना अर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेने (शिंदे गट) तर्फे गुरुवार (दि.१८) पासून, तर शिवसेना उबाठा व काँग्रेसतर्फे शुक्रवार (दि.१९) पासून प्रत्यक्ष मुलाखतींना प्रारंभ होत आहे. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान बनल्या आहेत.
भाजपकडे सर्वाधिक ९५० इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपतर्फे गेल्या तीन दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. बुधवारी (दि.१७) पाचशेहून अधिक मुलाखती झाल्या.
रात्री उशिरापर्यंत मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती. मुलाखतीसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भुज भुजबळ फार्म येथे मुलाखती घेण्यात आल्या. पंचवटी व नाशिकरोड विभागातील प्रत्येकी सहा प्रभागांत मुलाखत झाली. सिडको विभागातील प्रभाग २७ते २९ व ३१ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
भाजप कार्यालयात इच्छुकाचा गोंधळ
एका प्रभागातील इच्छुकाला मुलाखतीसाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागल्याने त्या इच्छुकाने भाजप कार्यालयात गोंधळ घातल्याची चर्चा आहे. आपल्याला आधीच बोलवून ठेवले. परंतु मुलाखतीला वेळेत बोलावले नाही असे सांगत, या उमेदवाराने गोंधळ घातला. येथे निष्ठावंतांवर अन्याय होतो असे सांगत, त्याने मुलाखत न देताच कार्यालयातून काढता पाय घेतल्याचे समजते.
मनसेकडून २५० अर्जाचे वितरण
मनसेकडूनही उमेदवारांची जोरदार चाचपणी केली जात असून, मंगळवार (दि. १६) पासून इच्छुकांना अर्ज वितरणास सुरुवात केली. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत सुमारे २५० अर्जाचे वितरण करण्यात आले असून, शुक्रवार (दि.१९) पर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या अर्जात प्रभागाची संपूर्ण माहिती, समस्या, प्रलंबित विकासकामे आदींसह मतदारसंख्या, उमेदवारांचे सामाजिक कार्य आदी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटातर्फे आजपासून मुलाखती
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने पक्षाच्या मायको सर्कल येथील कार्यालयात गुरुवार (दि.१८) पासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पक्षाचे सचिव राम रेपाळे, आमदार सुहास कांदे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे, विलास शिंदे यांच्या उपस्थितीत मुलाखती होतील.
उबाठाच्या शुक्रवारपासून मुलाखती
शिवसेना उबाठाकडे ३२५ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. शिवसेनेच्या कोअर कमिटीतर्फे पक्षाच्या शालिमार कार्यालयात शुक्रवार (दि.१९) पासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.